इस्लामपूर : अमेरिकेत स्थायिक झालेल्या आणि मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दरवर्षी साहित्य व समाजकार्य पुरस्कार दिले जातात. २०२० साठी वाङ्मय प्रकार पुरस्कार विज्ञानकथा या वाङ्मय प्रकारासाठी, विज्ञानकथा लेखक सुबोध प्रभाकर जावडेकर यांना देण्यात आला आहे. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुबोध जावडेकर यांनी सोळा पुस्तके लिहिली असून गुगली, वाचनाचे चौथे पाऊल, संगणकाची सावली, कुरुक्षेत्र, मेंदूच्या मनात, आकाश भाकीते पुढल्या हाका, चाहूल उद्याची, आदी पुस्तकांचा समावेश आहे. भोपाळ दुर्घटनेवर आधारित त्यांची ‘आकांत’ ही विज्ञान कादंबरी विशेष गाजली आहे. या कादंबरीचा मल्याळम भाषेत अनुवाद झाला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद, भारतीय भाैतिकी परिषद, पुणे मराठी ग्रंथालय, मराठी विज्ञान परिषद अशा विविध संस्थांच्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.
प्रख्यात लेखक, संपादक आणि थोर समाजवादी विचारवंत आचार्य शं. द. जावडेकर यांचे सुबोध हे नातू आणि गुरुकुल पद्धतीच्या निवासी शाळा शिक्षण व्यवस्थेचे पुरस्कर्ते प्रभाकर व लीलाताई जावडेकर यांचे सुपुत्र आहेत.
२५१२२०२०-आयएसएलएम-सुबोध जावेकर