सांगली - कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापुरानंतर आता तेथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, हजारो संसार पाण्याखाली गेल्यानं लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आलंय. पूर ओसरल्यानंतर गावागावात आणि घराघरात चिखल झाला आहे. आता, हे गाव पुन्हा उभारायचं कसं? पुन्हा आपलं घर सावरायचं कसं? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सांगलीतील गुरुजी आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुनर्वसनासाठी एक मार्ग सूचवला आहे.
यापूर्वी 2005 साली पूर आला होता, त्यावेळी लोकं म्हणत होते की 60 वर्षांपूर्वी असा पूर आला होता. मात्र, आता आलेला पूर अतिशय मोठा आहे, हे संकट खूप मोठं आहे. निसर्गापुढं सर्वांची अक्कल शून्य असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे या पुनर्वसनासाठी मोठं काम करावं लागेल. सैन्य चालतं ते सेनापतीच्या बळावर चालतं. सेनापती जर कुशल असेल तर उत्तम. काल रात्री बारा वाजता मला कळालं की, महाराष्ट्र शासनानं जे खेबुडकर होते, त्यांना परत इथे आणलं आहे. सरकारनं ही फार मोठी चांगली गोष्ट केली आहे. पण, आणखी एक गोष्ट केली पाहिजे, सेनापती म्हणून काम करण्यास खेबुडकर योग्य आहेत. तसेच, काळम पाटील आणले पाहिजेत, अफाट चांगला मनुष्य. पण दुर्दैवाने ते सेवानिवृत्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने ताबडतोब त्यांना इथं आणावं, अशी अपेक्षा संभाजी भिडे यांनी व्यक्त केली आहे. तसं केल्यास सगळ्या परिस्थितीत ताबडतोब फरक पडतो. यशा राजा-तथा प्रजा, जसा नेता-तशी जनता असे म्हणत काळम पाटील या सेवानिवृत्त आयएएस दर्जाच्या व्यक्तीला पुनर्वसन कामासाठी आणलं पाहिजे, असे संभाजी भिंडेंनी म्हटले आहे.
सांगली अन् कोल्पाहुरात आता पाणी ओसरल्याने संपूर्ण शहरं उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळत आहेत. आज सांगलीमधील हंडेपाटील तालीम रोडमध्ये शिवप्रतिष्ठान आणि त्यांचे संस्थापन संभाजी भिडे यांनी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निसर्गाच्या आपत्तीला आधुनिकीकरण जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी, बोलताना संभाजी भिडेंना अश्रू अनावर झाले होते. आईच्या काळजाप्रमाणं प्रत्येकानं या मदत कार्यात स्वत:ला झोकून दिलं पाहिजे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पुढील महिनाभर स्वत:चं बाजुला सारुन इतरांच्या दु:खात, पुनर्वसनात मदत करण्याचं सांगितल्यांचही भिडेंनी म्हटलं.
कोण आहेत काळम पाटील ?विजयकुमार काळम पाटील यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं होतं. याचवर्षी ते सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या कार्यकाळात, सांगलीकरांवर पाटील यांनी आणि पाटलांवर सांगलीकरांनी खूप प्रेम केलं. एक आदर्श जिल्हाधिकारी म्हणून पाटील हे सवपरिचित आहेत. काळम पाटील यांना आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कारानेही गौरवित करण्यात आले आहे. त्यामुळेच, ही पूरस्थिती हाताळण्यासाठी काळम पाटील यांना परत बोलावण्याची मागणी संभाजी भिंडेंनी केली आहे.