राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार कशाप्रकारे सत्तेत आलं यावर काँग्रेसचे नेते आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी भाष्य केलं. पलूस तालुक्यातील आमणापूर येथील विकास कामांचं उद्घाटन विश्विजित कदम यांच्या हस्ते पार पाजलं. यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी महाविकास आघाडी कशी सत्तेत आली यावर भाष्य केलं.
“विधानसभा निवडणुकीत जेव्हा आम्ही प्रचारासाठी फिरत होतो, तेव्हा आम्ही कानात सांगत होतो, मला निवडून दिलं तर कदाचित मला विरोधीपक्षाच्या बाजूला बसावं लागेल. आमची सत्ता काही येत नाही. परंतु निवडणूक झाली आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या अंगात आलं. ते बरं आणि राज्यात हे महाविकास आघाडीचं तीन पक्षाचं सरकार आलं,” असं विश्वजित कदम म्हणाले.
“इतिहासात एक अजब अशी गोष्ट घडली आणि तुमच्या आशीर्वादानं या मातीच्या पुण्याईनं राज्यात एक तरूण मंत्री म्हणून काम करण्याची मला मिळाली,” असंही ते म्हणाले.