शिंदे गटाचा गौप्यस्फोट अन् जयंत पाटलांनी एका वाक्यातच हवा काढली, काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 10:01 AM2024-01-01T10:01:26+5:302024-01-01T10:05:09+5:30
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता.
Jayant Patil ( Marathi News ) सांगली- काल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. 'जयंत पाटील यांच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्याचे शिरसाट म्हणाले, यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुटल चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, आता शिरसाट यांच्या या गौप्यस्फोटावर स्वत: जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
“सगळे थोतांड, फसवेगिरीचा बुरखा फाडावाच लागेल”; उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
"संजय शिरसाट यांनी विधान केलं आहे, याचा खुलासा त्यांनाच विचारा. ज्यांनी विधानं केली आहेत त्यांनाच विचारलं पाहिजे. मी याबाबत अनभिज्ञ आहे. मनाने इकडे आणि शरिराने तिकडे असं भासवणारी लोक मनाने इकडे पण आहेत. ते असं चालूच असतं.त्यांनीच आता याबाबत खोलात जाऊन सांगायला पाहिजे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.एखाद्या व्यक्तीवर लोकांच्या जास्त लक्ष असेल त्यांच्या विषयी अशा वावड्या उठवल्या जातात, कोण कोणाला जड जातंय हे येणाऱ्या काळात निवडणुकीत जनताच ठरवेल, असंही जयंत पाटील म्हणाले.
शिंदे गटाने केला मोठा गौप्यस्फोट
मंत्रिपदासाठी संजय शिरसाट देखील शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून इच्छुक आहेत. परंतू, त्यानंतर विस्तार होऊनही शिरसाटांना मंत्रिपदाने हुलकावणी दिलेली आहे. दुसरा विस्तार होणार अशी गेल्या चार-सहा महिन्यांपासून आवई उठविली जात आहे. परंतु, काही केल्या हा विस्तार होत नाहीय. भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट अशा तिघांना उरलेली मंत्रिपदे वाटून देण्यावरून तिढा सुटता सुटत नाहीय. त्यातच ज्यांना मिळणार नाही त्यांचीही नाराजी सोसावी लागेल, या पेचामुळे हा विस्तार रखडलेला आहे. असे असताना संजय शिरसाट यांनी जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याचा दावा केला आहे.
जयंत पाटील हे भाजपासोबत येणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार थांबला होता. भाजपासोबत जाण्याचा प्रस्तावच जयंत पाटलांनी मांडला होता. आमदार आणि आपण सर्व सोबत जाऊन शरद पवारांना हे सांगू अशी चर्चा ही केली होती. आजही पाटील हे शरीराने शरद पवारांसोबत आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.
जयंत पाटील यांनी राम मंदिरात कलश पूजन केले
आज आमदार जयंत पाटील इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील श्रीराम मंदिरात कलश पूजन केले. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, अयोध्येतील राम मंदिर न्यासाने उभे केले आहे. देशातील सर्वांनी यासाठी देणगी दिली आहे, त्यामुळे कोणा एकाची त्यावर मालकी असू शकत नाही. मंदिर उभारले जात आहे त्याला जास्त महत्व आहे. अयोध्येत दर्शनासाठी आता मी जाणार नाही, कारण तिथे जास्त गर्दी असणार आहे. मी गर्दी कमी असेल तेव्हा नक्की जाणार आहे, असंही पाटील म्हणाले. देशातील भाविक रामासाठी एकत्र आला आहे. मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर लोक आप आपल्या कामाला लागतील. याचा राजकीय फायदा कोणाला होईल असं मला वाटत नाही, कारण सगळ्यांची राजकीय भूमिका वेगळी आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.