सुशांत घोरपडेम्हैसाळ : कर्नाटक महामंडळाच्या बस महाराष्ट्राच्या सीमेवर म्हैसाळ (ता. मिरज) येथे थांबत नसल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच, महाराष्ट्र एसटी महामंडळाने दखल घेत कर्नाटक महामंडळास तातडीने पत्र धाडले. म्हैसाळमध्ये कर्नाटकच्या बसेस थांबवाव्यात, अशी सूचना या पत्राद्वारे करण्यात आली आहे.कर्नाटक एसटीच्या अडेलतट्टूपणाची तक्रार सीमाभागातील नागरिकांनी ‘लोकमत’कडे मांडली होती.त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच या प्रश्नाची गंभीर दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली. त्यातच सर्वपक्षीय पदाधिकारी आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत. दहा दिवसांत कर्नाटकने त्यांच्या सर्व आगारांना म्हैसाळ येथे बस थांबविण्याच्या सूचना न दिल्यास सर्वपक्षीय रास्ता रोको करण्याचा निर्धार करण्यात आला. सीमाभागातील म्हैसाळ, नरवाड, लक्ष्मीनगर, गायरानवाडी या गावांना त्रास सहन करावा लागत आहे.शिवसेनेचे तालुका संघटक सतीश नलावडे म्हणाले की, मी ३ मार्चला मुंबईहून मिरज बसस्थानकात आलो. मला म्हैसाळला जायचे होते. तेव्हा मी म्हैसाळ थांबा घेणार का, असा प्रश्न वाहकाला केला. तेव्हा त्याने दादागिरीची भाषा वापरली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहे.सांगलीच्या एसटीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी सांगितले की, कर्नाटक बसेस म्हैसाळला थांबविण्याबाबत आम्ही कर्नाटक महामंडळाला गुरुवारी पत्रव्यवहार केला आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.
महाराष्ट्र एसटी महामंडळाने धाडले कर्नाटकला पत्र, म्हैसाळला बसेस थांबविण्याची केली सूचना; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
By अविनाश कोळी | Published: March 09, 2023 7:00 PM