Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 08:26 PM2024-10-30T20:26:11+5:302024-10-30T20:29:32+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ७० हजार कोटींच्या सिंचन फाईलवरुन आर आर पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. तासगाव विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. काल बुधवारी अजित पवार यांनी सभेत सिंचन फाईलवरुन दिवंगत आर आर पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज रोहित पाटील यांनी 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ', असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी कोणचही नाव घेतले नाही, त्यामुळे रोहित पाटील यांचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा सुरू आहे.
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
तासगाव येथील सभेत बोतलाना रोहित पाटील म्हणाले, "अनेक लोकांनी आबांच्या बाबतीत अनेक गोष्टी बोलल्या. मी सगळ्या गोष्टींचा आज उलगडा करणे उचित नाही. पण, माझे वडील हयात असताना माझ्या वडिलांना काय काय मानसिक त्रास झालाय हे आबांच्या पुण्या, मुंबईतील अनेक मित्रांनी मला सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, गृहमंत्रिपदी काम करत असताना आमच्या खांद्यावर डोक ठेऊन आबा रडायचे, ते कुणी त्रास दिला म्हणून रडायचे याचे उत्तर मला आज द्यायचं नाही. याचे उत्तर मी योग्य वेळ आल्यावर देईन, असा इशारा रोहित पाटील यांनी दिला, पाटील यांचा रोख नेमका कोणाकडे आहे याची राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे.
अजित पवार यांनी कोणता गौप्यस्फोट केला होता?
७० हजार कोटींच्या सिंचनाचा आरोप केला. अजितराव घोरपडे तेव्हा मंत्री होते. माझ्यावर जो आरोप झाला तेव्हा महाराष्ट्राची निर्मिती होऊन त्यादिवसापर्यंत पगाराचा खर्च ४२ हजार कोटींचा होता. मला ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांचा विश्वास बसेल असं झाले, मग त्यातून एक फाईल तयार झाली ती गृहखात्याकडे आली. तेव्हा आबांनी अजित पवारांनी उघड चौकशी करावी अशी सही केली. केसाने गळा कापायचे धंदे, मला हेदेखील माहिती नव्हते. आपण पृथ्वीराज चव्हाणांचा पाठिंबा काढून घेतला, सरकार गेले, तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली, त्यावेळचे राज्यपाल म्हणाले, मी या फाईलवर सही करणार नाही. नवीन सरकार आले त्याचा मुख्यमंत्री करेल. निवडून आले देवेंद्र फडणवीस सरकार, देवेंद्र फडणवीसांनी सही केली. मला घरी बोलावले, मुख्यमंत्र्याकरता जी सही होती ती त्यांनी केली, तेव्हा गृहमंत्री म्हणून आबांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते, त्यांची सही दाखवली. मला इतकं वाईट वाटलं. जीवाभावाचा सहकारी होता, आपलं काहीतरी चुकलं असेल त्यामुळे कामाला लावलं असेल असा आरोप अजित पवारांनी आबांवर केला.