Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 01:01 PM2024-11-14T13:01:45+5:302024-11-14T13:02:37+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भरसभेत लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना मदत झाल्याची कबुली दिली.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काल सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी थोरात यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना काँग्रेसची मदत झाल्याची जाहीर कबुली दिली.
सांगलीत जाहीर सभेत बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, आताच लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभा निवडणुकीत आपल्या सगळ्यांची मदत विशाल पाटील यांना झालेली आहे, हे कोणाला नाकारता येणार नाही.तुमच्या सगळ्यांची मदत झालेली आहे, त्याशिवाय खासदार होऊ शकणार नाहीत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, या वसंतदादा पाटील यांची पुण्याई सुद्धा उपयोगी आली असेल. परत विधानसभेची निवडणूक आली माझ्याकरता एक प्रश्न होता, एका बाजूला जयश्रीताई होत्या. मदन पाटील यांचे कुटुंब आणि हे पृथ्वीराजबाबा जवळचे त्यामुळे अशावेळेला निर्णय घेणे कठीण. प्रदेश काँग्रेस आणि अखिल भारतीय काँग्रेसलाही कठीण. पण हा सगळा विचार करत असताना तुमच्या सगळ्यांचे सहकार्य, आता या ठिकाणी शिवसेनावाले बसले आहेत, आम्हाला क्षमा करा. सगळ्यांच्या मदतीनेच विशाल पाटील यांचा विजय झाला हे नाकारता येणार नाही. कारण त्यात तुमच्या सर्वांचे आशीर्वाद होते, अशी जाहीर कबुली बाळासाहेब थोरात यांनी सभेत दिली.
"यावेळी आघाडीचे सरकार येणार, आमचा कोणही मुख्यमंत्री झाला तरीही चालतो मला काही अडचण नाही. पण, मुख्यमंत्रिपदाची चर्चा फक्त आघाडीची होते. युतीची कधी चर्चा झाली का? त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची चर्चा करावी, असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी महायुतीवर लगावला.
सांगली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे, महायुतीने भाजपा नेते सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात सांगली विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे.