Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. महायुतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात मोठी मोर्चेबांधणी करत विरोधकांना एकत्र आणले आहे. तर महाविकास आघाडीनेही अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. शरद पवार स्वत: बारामतीमध्ये प्रचार करत आहेत. दरम्यान, आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. "मी काही अजित पवार यांच्यासारखे खासगी कारखाने खरेदी करत बसलो नाही किंवा खासगी कारखाने काढण्याचे स्वप्न आम्ही बघत नाही, असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवारांना लगावला. पाटील आज खानापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
काही दिवसापूर्वी आष्टा येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर संभाजी पवारांचा कारखाना जयंत पाटील यांनी घेतला असा आरोप केला होता. पवार यांच्या आरोपाला जयंत पाटील यांनी आज प्रत्युत्तर दिले. जयंत पाटील म्हणाले, कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही किंवा आमचे कारखाने बळकवण्याचीही भूमिका नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
जयंत पाटील म्हणाले, राजाराम बापू साखर कारखाना हा काय माझा खासगी कारखाना नाही. तर तो सहकारी साखर कारखाना आहे. धुराडं पेटवणार म्हणजे काय? आम्ही साखर कारखाने सुरु व्हावेत ही आमची भूमिका आहे. साखर कारखाने बळकावण्याची आमची भूमिका नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.आष्टा येथे एका नेत्याने सांगितले की, संभाजी पवार यांचा कारखाना जयंत पाटील यांनी घेतला.संभाजी पवार त्यावेळी माझ्याकडे आले मला म्हणाले हा कारखाना तुमच्याकडे घ्या. मी यावेळी बँकांना बोलावले, वन टाईम सेटलमेंट केली,त्यावेळी पाच ते सहा बँकांना बोलावले ७०, ७५ कोटी रुपये होते. राजारमबापू कारखान्याने ते पैसे भरले, त्यातून कारखाना सोडवला, पाच वर्षे आम्ही कारखाना चालवू असा करार होता, शेवटच्या दोन वर्षात पैसे द्यावेत आणि कारखाना घ्यावा असा करार होता. करारा प्रमाणेच काम करावं लागते, जे लोक आष्टात आले होते त्यांना बऱ्याच गोष्टी माहित नाहीत. त्यांचा सारखा खासगी कारखाना मी काही खरेदी करत बसलेलो नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला.