Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
By संतोष कनमुसे | Published: October 27, 2024 08:33 PM2024-10-27T20:33:48+5:302024-10-27T20:34:11+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चर्चा सुरू आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election ( Marathi News ) : राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत वेगळीच रंगत आली आहे, कारण या पाच वर्षात राज्यात वेगळीच राजकीय समीकरणे झाली आहेत. ज्या पक्षांनी २०१९ च्या निवडणुका एकमेकांच्याविरोधात लढल्या, तेच पक्ष आज सोबत आले आहेत. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यामुळे या दोन्ही पक्षातील दोन्ही गट एकमेकांविरुद्ध लढत आहेत. सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदार संघातील लढतीमध्ये रंगत आली आहे,राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक आणि भाजपाचे सत्यजित देशमुख यांच्यात लढत असणार आहे. पण भाजपामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. जर ही बंडखोरी झाली तर यावरही येथील लढतीचे गणित अवलंबून आहे.
शिराळा विधानसभा मतदारसंघातील लढती जवळपास निश्चित झाल्या आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक मैदानात आहेत, तर महायुतीकडून भाजपा नेते सत्यजित देशमुख यांची उमेदवारी काल जाहीर झाली आहे. यामुळे या मतदारसंघातील लढत जोरदार होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ हातकणंगले लोकसभामध्ये येतो, जूनमध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी दिली होती, पण महायुतीचे धैर्यशील माने यांनी विजय खेचून आणला. दोन्ही बाजूंनी आता प्रचाराला सुरुवात झाली आहे.
बंडखोरी झाली तर अडचणी वाढणार?
या मतदारसंघात शिराळा तालुका पूर्ण येतो आणि वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश होतो. या गावांतील मतदान निर्णायक असते. भाजपाचे सम्राट महाडिक यांच्या गटाची ताकदही मोठी आहे. उमेदवारीसाठी सम्राट महाडिक यांनीही दावा केला होता. वाळवा तालुक्यातील ४८ गावांसह त्यांचा शिराळा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. त्यांनीही गेल्या काही वर्षापासून तयारी केली होती. पण उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आज माध्यमांना अपक्ष अर्ज दाखल करुन निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता या मतदारसंघात मोठी रंगत आली आहे. हा मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी भाजपाने मोठी तयारी केली आहे. पण, जर महाडिक यांनी बंडखोरी केली तर भाजपाच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काय?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आमदार मानसिंगराव नाईक मैदानात होते त्यांच्याविरोधात शिवाजीराव नाईक भाजपचे उमेदवार होते. त्यावेळी सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली होती. महाडिक हे अपक्ष लढूनही त्यांना ४६ हजार मतदान झाले होते. २०१९ ला राष्ट्रवादी मानसिंगराव नाईक यांना १,०१,९३३ एवढी मत मिळाली होती तर शिवाजीराव नाईक यांना ७६,००२ मत मिळाली होती. तर दुसरीकडे यावेळी भाजपला भगतसिंग नाईक यांची ताकद मिळणार आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतांचं गणित काय?
जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सत्यजित पाटील यांना ९ हजारांचे मताधिक्य होते. महाविकास आघाडीच्या सत्यजित पाटील यांना ९०,००१ एवढी मत मिळाली होती, तर महायुतीच्या धैर्यशील माने यांना ८०,७२० एवढी मत मिळाली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना १७,४९९ मत मिळाली होती.
शिराळा विधानसभेतील मतदारसंख्या
शिराळा विधानभा मतदारसंघात १ लाख ५५ हजार ३७६ एवढे पुरुष मतदार आहेत, तर १ लाख ४९ हजार ८२९ एवढ्या स्त्रिया मतदार आहेत. शिराळा विधानसभा मतदारसंघात सप्टेंबर २०२४ च्या अखेर एकुण ३ लाख ०५ हजार २०८ एवढे मतदार आहेत.