Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत आता मोठी रंगत आली असून सोप्या वाटणाऱ्या लढती आता अवघड वाटत आहेत. शिराळा विधानसभा मतदारसंघातही हीच परिस्थिती आहे, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मानसिंगराव नाईक तर महायुतीकडून भाजपाचे नेते सत्यजीत देशमुख निवडणूक लढत आहेत. महायुतीला सम्राट महाडिक यांची बंडखोरी मागे घेण्यात यश आले आहे, यामुळे आता शिराळा विधानसभेतील लढतीला चुरस आली आहे.
महाविकास आघाडीने महायुतीच्या आधी मानसिंगराव नाईक यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यांच्याविरोधात महायुती कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महायुतीमध्ये भाजपाचे सम्राट महाडिक आणि सत्यजीत देशमुख या दोन्ही नेत्यांनी उमेदवारीची मागणी केली होती. भाजपाने सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी दिली, यामुळे इच्छुक असलेले सम्राट महाडिक यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीसाठी ही लढत सोपी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या, महायुतीमधील मतविभागणी होऊन महाविकास आघाडीला याचा फायदा होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण काही दिवसातच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी महाडिक यांची समजूत काढली, महाडिकांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेत सत्यजीत देशमुख यांना पाठिंबा दिला.
प्रचारात कुणाचं पारडं जड?
तिकीट जाहीर झाल्यापासूनच महाविकास आघाडी आणि महायुतीने प्रचाराला जोरदार सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. महायुतीचे उमेदवार सत्यजीत देशमुख यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची जाहीर सभा झाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेतली. तर महाविकास आघाडीच्या मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर सभा घेतल्या आहेत. पाटील यांनी वाळवा तालुक्यातील ४८ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या आहेत.दोन्ही बाजूंनी प्रचारात मोठा जोर आहे.
शिराळा विधानसभा मतदारसंघातील प्रचारात महाविकास आघाडी आणि महायुतीने आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील विकास, सहकार या दोन्ही मुद्द्यावरुन प्रचाराला रंगत आली आहे. पण या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे सांगता येणार नाही, कारण दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरू आहे.
२०१९ मध्ये मतांच गणित काय?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आमदार मानसिंगराव नाईक मैदानात होते त्यांच्याविरोधात शिवाजीराव नाईक भाजपचे उमेदवार होते. त्यावेळी सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली होती. महाडिक हे अपक्ष लढूनही त्यांना ४६ हजार मतदान झाले होते. २०१९ ला राष्ट्रवादी मानसिंगराव नाईक यांना १,०१,९३३ एवढी मत मिळाली होती तर शिवाजीराव नाईक यांना ७६,००२ मत मिळाली होती. तर दुसरीकडे यावेळी भाजपला भगतसिंग नाईक यांची ताकद मिळणार आहे.