Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख संपली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी अनेक मतदारसंघात बंडखोरी केली आहे. आता दोन्ही आघाडीतील नेत्यांनी बंडखोरी केलेल्या नेत्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. काल रात्री भाजपा नेते सम्राट महाडिक यांची आणि भाजपाच्या नेत्यांनी भेट घेतली. यावेळी अर्ज माघार घेण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यावर आता महाडिक यांनी व्हिडीओ शेअर करुन माहिती दिली आहे.
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
काल बुधवारी रात्री भाजपा नेते सम्राट महाडिक यांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याबाबत महाडिक यांनी एक व्हिडीओ शेअर करुन माहिती दिली. महाडिक म्हणाले, अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर काल मला देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला खासगी विमानाने बोलावून घेतले. त्या ठिकाणी अर्ज माघारीसाठी आणि मनधरणीसाठी चांगली चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी मनधरणीसाठी चांगल्या पद्धतीने चर्चा केली, असंही सम्राट महाडिक म्हणाले.
"माझा अपक्ष अर्ज हा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दाखल केला आहे. माघारीच्या निर्णयाआधी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन आम्ही त्यांचा जो निर्णय होईल तो त्यांना आम्ही कळवणार आहे, असंही सम्राट महाडिक म्हणाले.
भाजपाने शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी दिली. सम्राट महाडिक यांनीही उमेदवारीची मागणी केली होती. देशमुख यांना उमेदवारी मिळताच महाडिक यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यांना अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या बंडखोरीमुळे भाजपाला मोठा फटका बसण्याची भीती होती त्यामुळे त्यांना अर्ज माघारी घेण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न सुरु केले होते. दरम्यान, आता अर्ज माघारी घेण्यावर सम्राट महाडिक कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्नाचे ठरणार आहे.