सुरेंद्र दुपटेसंजयनगर : हरियाणा येथे खेलो इंडिया यूथ गेम्स २०२२ मध्ये महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळाले. वेटलिफ्टिंग स्पर्धेत सांगलीच्या काजल सरगर हिने पहिले पदक मिळवून दिले. तिच्या या यशस्वी कामगिरीमुळे सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राच नाव उज्ज्वल झाले. काजलने मिळवलेल्या पदकानंतर ती राहत असलेल्या संजयनगर परिसरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पेढ्याचे वाटप करण्यात आले.काजल ही एका चहाच्या टपरी वाल्याच्या मुलगी आहे. तीने वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्याने आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया तीचे वडील महादेव सलगर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.घरची परिस्थिती बेताची तरी..सांगली शहरातील संजयनगर येथील शिंदे मळा अहिल्यादेवी होळकर चौकांमध्ये सरगर कुटुंबिय राहत आहे. तिचे वडील महादेव सरगर व आई राजश्री सरगर हे दोघे चहाची टपरीचा व्यवसाय करतात. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी त्यांचा मुलगा संकेत व मुलगी काजलला वेटलिफ्टिंगमध्ये घातले. मयूर सिंहासणे तीचे प्रशिक्षक आहेत.११३ किलो वजन उचललंकाजलने ४० किलो वजन गटात ११३ किलो वजन उचलून विक्रम केला. तिने स्नॅचमध्ये ५०, तर क्लीन व जर्कमध्ये ६३, असे एकूण ११३ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले.
खेलो इंडिया यूथ गेम्स २०२२: सांगलीतील चहावाल्याच्या मुलीने वेटलिफ्टिंगमध्ये मिळवलं सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 5:40 PM