अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: अलमट्टी धरणाची सध्याची उंची ५१९.६०० मीटर असून ती कर्नाटक सरकार ५२४.२५६ मीटर करणार आहे. कर्नाटकच्या या भूमिकेला महाराष्ट्र सरकार विरोध करणार असून केंद्रीय जल आयोगाकडे दाद मागणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढवू दिली जाणार नाही, असे आश्वासन सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी नागरिक जागृती मंचच्या शिष्टमंडळाला दिले.
केंद्रीय जल आयोगानेही कर्नाटक राज्याला अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी मंजुरी दिली आहे. धरणाची उंची वाढवल्यास धरणामध्ये ८० टीएमसी पाणीसाठा वाढणार आहे. त्याची क्षमता २०० टीएमसीपर्यंत होणार आहे. धरणातील या पाणीसाठ्याचा महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांना फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीतील नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, प्रदीप कांबळे, आनंद देसाई यांनी शनिवारी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली. यावेळी खाडे बोलत होते. सतीश साखळकर यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास सांगली, मिरज शहरासह वाळवा, पलुस, मिरज तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या १०४ गावांना फटका बसणार आहे. या भागातील शेतकरी, गावातील बाजारपेठ व नागरी वस्तीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, अशी भूमिका पालकमंत्री खाडे यांच्याकडे मांडली.
यावर पालकमंत्री खाडे यांनी अलमट्टी धरणामुळे पश्चिम महाराष्ट्राचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये अलमट्टी धरणाची उंची कर्नाटक सरकारने वाढवू नये, अशी भूमिका केंद्र सरकार आणि केंद्रीय जल आयोगाकडे महाराष्ट्र सरकार मांडणार आहे. कर्नाटकच्या भूमिकेला पूर्ण ताकदीने विरोध करणार आहे.
अलमट्टी धरणाचा प्रश्न काय?
कर्नाटकमधील सर्वात मोठे धरण म्हणून अलमट्टी धरणाची ओळख आहे. हे धरण उत्तर कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात कृष्णा नदीवर आहे. सध्या धरणात १२३ टीएमसी पाणीसाठा आहे. या धरणामुळेच २००५ व २००९ मध्ये कृष्णा नदीला महापूर आल्याचा ठपका महाराष्ट्राकडून ठेवला होता. धरणाची सध्याची उंची ५१९.६०० मीटर असून ती ५२४.२५६ मीटर करणार आहे. त्याला केंद्रीय जल आयोगानेही कर्नाटकाला मंजुरी दिली आहे. या उंची वाढवल्यास धरणाची क्षमता २०० टीएमसी होणार आहे.