या कर्ज योजनेअंतर्गत लघु उद्योजकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. उद्योजकांनी तशी कर्जप्रकरणे सादर केली; परंतु कर्जप्रकरणांची संख्या जास्त झाल्यामुळे प्रशासनाने लॉटरी पद्धतीने मंजूर करण्यात आली व कर्जदार, जामीनदारांची हमीपत्र व इतर कागदपत्रे जमा करून घेतली. मार्च २०२० पर्यंत निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रकरणे वितरीत करण्यात येतील, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मार्च २०२० पासून लाॅकडाऊन जाहीर झाला आणि लघु उद्योजकांच्या आशेवर पाणी फिरले.
आता सर्व काही व्यवस्थित सुरू झाले आहे. त्यामुळे लघु उद्योजकांच्या नजरा या कर्ज प्रकरणांकडे लागल्या आहेत.
त्यामुळे लघु उद्योजकांनी संबंधित विभागाकडे या कर्ज योजनेबद्दल माहिती घेतली असता प्रशासनाकडून निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
चाैकट
खर्च वाया जाण्याची भीती
दहा महिने झाले तरी अजूनही कर्जप्रकरणे निकाली काढण्यात आली नाही, यामुळे कर्ज प्रकरणांसाठी लघु उद्योजकांनी केलेला आर्थिक खर्च वाया जातो की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन पाठपुरावा करून कर्ज प्रकरणे निकाली काढावीत व लघु उद्योजकांना दिलासा द्यावा एवढीच अपेक्षा लघुउद्योजकवर्गाची आहे.