पुसेगाव : ‘महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवली. खटाव तालुक्यासारख्या दुष्काळी भागात असलेल्या त्यांच्या कुलभूमी कटगुण येथे नायगावप्रमाणे शिल्पसृष्टी उभारण्यासाठी प्रयत्नशील राहू,’ अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.कटगुण, ता. खटाव येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, महिला बालकल्याण सभापती वनिता गोरे, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, पंचायत समिती सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, जिल्हा परिषद सदस्या सुनीता कचरे, पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे, उपसरपंच उदय कदम, माजी सरपंच सुधीर गोरे, ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ गायकवाड, प्रकाश गोरे, जितेंद्र गोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.संजीवराजे म्हणाले, ‘महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने बहुजनांच्या मुला-मुलींसाठी शिक्षण प्रसाराचे कार्य केले. हे करत असताना त्यांना त्याकाळी समाजात अनेक संकटांना सामोरे जावे लागले. तरीही फुले दाम्पत्याने आपले ज्ञानदानाचे काम कोणताही जातीभेद न करता सुरू ठेवले. त्यांच्या या ज्ञानदानामुळेच आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊनकाम करताना दिसत आहे. पूर्वीच्या अनेक अनिष्ट प्रथा बंद करून चांगल्या रुढी व परंपरा उदयास आणल्या. तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, यासाठी ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना त्यांनीच मांडली. त्या विचारसरणीनुसार आजही जलसंधारणाची कामे केली जात आहेत. महात्मा फुले यांचे शिक्षण व शेती क्षेत्रातील प्रेरणादायी आहे. कटगुण येथील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सर्वतोपरी सहकार्य करेल,’ असेही ते म्हणाले. (वार्ताहर)शिल्पसृष्टी साकारल्यास प्रेरणा मिळेल‘कटगुण ही महात्मा जोतिबा फुले यांनी कुलभूमी आहे. गोरगरिबांच्या शिक्षणासाठी व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या कार्याचा अन् विचाराचा वारसा जपण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. कटगुण येथे महात्मा फुले यांची शिल्पसृष्टी उभारल्यास यापासून सर्वांनाच प्रेरणा मिळेल. शिल्पसृष्टी साकारण्यासाठी लवकरात-लवकर ठोस निर्णय घ्यावे,’ असे मत ग्रामस्थ विपुल गायकवाड यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले यांची शिल्पसृष्टी उभारणार
By admin | Published: April 12, 2017 10:51 PM