सांगली : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेवर आहे. भाजप विरोधी पक्ष आहे. असे असताना जतमध्ये मात्र राष्ट्रवादीची काँग्रेसपेक्षा भाजपशीच जास्त मैत्री कशासाठी, असा सवाल काँग्रेसचे जत तालुकाध्यक्ष अप्पाराया बिरादार यांनी केला. जतमध्ये आघाडीत बिघाडी होण्याची वेळ आल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहे, असेही ते म्हणाले.
जतमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांमधील संघर्षाबाबत भूमिका मांडण्यासाठी शुक्रवारी सांगलीत काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बिरादार बोलत होते. जतच्या नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, नीलेश बामणे, भूपेंद्र कांबळे, साहेबराव कोळी, बाळ निकम, महादेव कोळी, इराण्णा निडोणी उपस्थित होते.
बिरादार म्हणाले, भाजपशी सगळीकडे दोन हात करत राज्य चालवले जात आहे. अशा स्थितीत जतची राष्ट्रवादी भाजपशी समझोता करत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचे आदेश असताना राष्ट्रवादीने काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांच्या विरोधात काम केले, तरीही सावंत ३५ हजार मतांनी विजयी झाले. जत नगरपालिका काँग्रेसकडे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा होऊन उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीकडे आणि विषय समित्यांत समान जागा वाटप केले. हे सारे सुरळीत चालू शकले असते. मात्र, राष्ट्रवादीने आमदार सावंत यांच्या द्वेषातून टीका करणे सुरू केले आहे. नगरपालिकेची कामे आम्ही मंजूर करतो, त्याचे उद्घाटन मात्र राष्ट्रवादीचे लोक भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांना घेऊन करत आहेत. जयंत पाटील यांच्या कामावर आम्ही समाधानी आहोत. आ. सावंत कर्नाटकातून पाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत जतच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यांनी जतमधील राष्ट्रवादीचा प्रश्नही मार्गी लावायला हवा. त्यांनी या नेत्यांना सूचना द्यावी.
चौकट
काँग्रेस स्वबळावर लढण्यास सज्जच
जतमध्ये काँग्रेस पक्ष विकासकामांमुळे वाढला आहे. सर्वसामान्यांची कामेही केली आहेत. यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी प्रामाणिकपणे सोबत आली तर ठीकच आहे, नाही तर स्वबळावर लढण्यास काँग्रेस सज्ज आहे, असा इशाराही बिरादार यांनी दिला.