सांगली : मान्सून लांबल्यामुळे जलसंपदा विभागाने कृष्णा नदीतील पाणी उपशावर बंदी घातली आहे. ‘जलसंपदा’ने महावितरणला कृष्णा नदीवरील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महावितरणने दीड हजारांवर कृषिपंपांची वीज खंडित केली आहे. त्यानंतर रविवार ते मंगळवार असे तीन दिवस वीज चालू राहणार आहे.कोयना धरणात १२.०७ टीएमसी, तर वारणा धरणात ११.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. तो अत्यंत कमी असल्यामुळे त्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे १४ ते १७ जूनपर्यंत कृष्णा नदीवर उपसा बंदी आदेश लागू केला आहे. या कालावधीत पाणी उपसा केल्यास पाणी व विजेचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.त्यानंतरही काही सिंचन योजना बुधवारी सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना पत्र पाठवून कृष्णा नदीवरील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना सोडून अन्य सर्व योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना केली. त्यानुसार महावितरण कंपनीने जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील जवळपास दोड हजार पाणी योजनांचा वीजपुरवठा गुरुवारी खंडित केला. मात्र पिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार कृष्णा नदीवरील कृषिपंपांचा वीजपुरवठा १४ ते १७ जूनपर्यंत चार दिवस खंडित केला आहे. पाणी टंचाईमुळे हा निर्णय घेतला असून, पाटबंधारे विभागाच्या सूचनेनंतर रविवार, दि. १८ ते २० जून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. -धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता, महावितरण.
कोयना धरणात १२.०७ टीएमसी आणि वारणा धरणात ११.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. तो भरपूर असून अजून दोन महिने पुरेल एवढा आहे. पंधरा दिवसात पाऊस सुरू होणार असल्यामुळे अधिकाऱ्यांनी उपसा बंदी घालून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. हा आदेश मागे घेण्याची गरज आहे. - संजय कोले, शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख.