आष्टा : महावितरणचे कंत्राटी कर्मचारी अजित मुकुंद बनसोडे (वय- ३४ रा. भडकंबे, ता. वाळवा, जि. सांगली) हे विजेच्या तीव्र धक्क्याने मरण पावले. ही घटना काल, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.अजित हे कंत्राटी वायरमन म्हणून सुमारे दहा वर्षापासून महावितरणमध्ये काम करत होते. मागील सुमारे एक वर्षापासून आष्टा सेक्शन एकमध्ये ते कार्यरत होते. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे बसस्थानक परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. तो पूर्ववत करण्यासाठी अजित गेले होते. हॉटेल प्रियंका व समृद्धी या दरम्यान असलेल्या विद्युत खांबावर चढून दुरुस्ती करत असताना त्यांना विजेचा तीव्र धक्का बसल्याने अजित विद्युत खांबाला चिकटले. शरीरातून वीजप्रवाह प्रवाहित झाल्याने जाग्यावरच ठार झाले.खांबाला वायरमन चिटकल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली होती. आष्टा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन गायकवाड व अण्णासाहेब पडळकर व महावितरण चे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साह्याने विद्युत कर्मचाऱ्यांनी बनसोडे यांना खाली उतरून घेतले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी महावितरण बेजबाबदारकंत्राटी कर्मचाऱ्याबाबतीत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. महिन्यापूर्वीच अंबाबाई मंदिरा नजीक एका कर्मचाऱ्यांचा रात्रीच्या वेळी मृत्यू झाला होता. पाठोपाठ गुरुवारी अजित बनसोडे यांच्यानिमित्याने आणखी एका कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांच्याविषयी अधिकारी वर्गाची भूमिका बेजबाबदार असल्याची घटनास्थळी चर्चा झाली.
सांगली: आष्ट्यात विजेच्या खांबाला चिकटून 'महावितरण'च्या वायरमनचा मृत्यू, महिनाभरात दुसरी दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 12:14 PM