सांगली : महागाईच्या काळामध्ये जिल्ह्यातील लाखो वीज ग्राहकांना महावितरणने दुहेरी शॉक दिला आहे. मासिक वीज बिलाबरोबर सुरक्षा अनामत रकमेसह बिल भरण्याचा मेसेज ग्राहकांपर्यंत पोहोचल्याने हे कोणते बिल दिले आहेत, अशा संभ्रमामध्ये ग्राहक आहेत. महागाईचा मार सोसणाऱ्या सामान्य जनतेला या सुरक्षा ठेवीसाठी पुन्हा भुर्दंड सोसण्याची वेळ ओढवल्याने संतापाचे वातावरण आहे.महागाईच्या झळा सहन करणाऱ्या जिल्ह्यातील वीज ग्राहकांना एप्रिल महिन्यात दोन बिले आल्याने येथील वीज वितरणच्या कार्यालयातील चौकशी कक्षामध्ये या दुहेरी बिलाची विचारणा होत आहे. सुरक्षा अनामतीचे हे बिल नियमानुसार असून ते वरूनच आल्याचे कर्मचारी सांगत आहेत. महावितरणचे अधिकारी म्हणाले, एक एप्रिलपासून लागू झालेल्या वीज दरानुसार महावितरणकडून वीज बिलांची आकारणी होत आहे. ग्राहकांची सुरक्षा ठेव सरासरी देयकांच्या दुप्पट तसेच त्रैमासिक बिले नसलेल्या ग्राहकांनी सुरक्षा ठेव दीडपट करण्याची तरतूद विद्युत नियामक आयोगाकडून केली आहे. या तरतुदीनुसार महावितरणकडून वीज ग्राहकांना संबंधित आवश्यक सुरक्षा ठेव रकमेच्या फरकाची स्वतंत्र बिले दिली आहेत. पूर्वी महावितरण एक महिन्याचे बिल सुरक्षा ठेव म्हणून ठेवत होते. मात्र, आता विद्युत नियामक आयोगाने त्या नियमात बदल केला आहे. सुरक्षा ठेव रक्कम वाढवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. एक महिन्याऐवजी दोन महिन्यांचे बिल ठेव म्हणून ठेवणार आहे. त्यामुळे ही रक्कम ग्राहकांना भरावी लागणार आहे. आता आलेले बिल आणि पुढील महिन्यात येणारे बिल जास्त प्रमाणात येणार आहे. सुरक्षा ठेवीची रक्कम जमा न केल्यास पुढील महिन्याच्या बिलात ही रक्कम वसूल करणार आहे.महावितरणने मनमानी कारभार थांबवावा : सतीश साखळकरआम्ही हरकती दाखल केल्या होत्या. त्याबाबत आजअखेर कोणताही निर्णय नाही. सुनावणीत काय झाले याबाबत आम्हाला कोणती कल्पनाही दिली नाही. हा महावितरणचा मनमानी कारभार सुरू आहे. न्याय देण्याऐवजी वीज दरवाढीच्या धक्क्याबरोबरच अनामत रक्कम म्हणून २५० रुपयांचे बिल वीज ग्राहकांना दिले आहेत. महावितरणने वीज ग्राहकांना न्याय देण्याऐवजी डबल झटका दिला आहे. म्हणून वीज ग्राहकांनी अनामत रक्कमेची वीज बिल भरू नयेत, असे आवाहन सर्व पक्षीय कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यातील वीज ग्राहकांना महावितरणाचा दुहेरी शॉक, अनामत ठेवीबरोबरच वीज दरवाढही लादली
By अशोक डोंबाळे | Published: April 21, 2023 6:40 PM