सांगली : रक्ताअभावी थांबलेले उपचार, रुग्णांच्या नातेवाइकांची रक्तासाठी सुरू असलेली धावाधाव या गोष्टी बदलण्यासाठी रक्तदात्यांच्या मदतीने ‘लोकमत’च्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात २ जुलैपासून ‘नातं रक्ताचं’ या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. २ जुलै रोजी ‘लोकमत’च्या सांगली कार्यालयातून याचा प्रारंभ होणार आहे.
‘लोकमत’चे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दि. २ ते १५ जुलै या कालावधीत ‘नातं रक्ताचं’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध संस्था, संघटना ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहेत. २ जुलै रोजी सकाळी १० वाजता सांगलीच्या राम मंदिर चौकातील ‘लोकमत’च्या कार्यालयात शिबिराचा प्रारंभ होणार आहे. आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याहस्ते शिबिराचा प्रारंभ हाेणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे रक्तदानाचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. या परिस्थितीत सामाजिक दायित्व म्हणून ‘लोकमत‘ने पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिरातून शेकडो रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. अनेकांना जगण्याचे बळ मिळणार आहे. रक्ताला जात, धर्म, पंथ नसतो. रक्तदानाने माणुसकीचे नाते तयार होते. त्यामुळे रक्तदानाच्या या महायज्ञात दात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’च्यावतीने करण्यात आले आहे.
चौकट
यांनी करावे रक्तदान
१८ ते ६० वयोगटातील व्यक्ती
कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते