म्हैसाळ : गुढीपाडव्याच्या मुहूर्ताचे औचित्य साधून आरग (ता. मिरज) येथील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम २०२१-२२ साठी ऊस तोडणी व वाहतूक कराराचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी मनोज शिंदे-म्हैसाळकर म्हणाले, २०२१-२२ या आगामी हंगामात कमीत कमी ५ लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट आहे. कारखान्याकडील को जनरेशन प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवून ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीतजास्त ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवण्यात येईल. यासाठी कार्यक्षेत्रातील सक्षम ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी या संस्थेकडे जास्तीतजास्त करार करून चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करावा. याबाबत ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी समाधान व्यक्त केले. लवकरच पुढील कराराची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी भावना वाहतूकदार व ऊस ताेडणी कंत्राटदारांनी व्यक्त केली.