कणेगाव (ता. वाळवा) येथे माहेरवाशिणींनी पूरग्रस्तांना मदत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तांदूळवाडी : नुकत्याच आलेल्या महापुराचा कणेगाव व भरतवाडीला मोठा फटका बसला. घरे, साहित्याचे मोठे नुकसान झाले. गरीब-श्रीमंत सर्वांचीच दैना उडाली. माहेरी झालेल्या अशा अवस्थेने माहेरवाशिणींचे मन मात्र व्याकुळ झाले.
प्रा. सुरेश आडके यांच्या कल्पनेतून कणेगावच्या माहेरवाशिणी हा व्हॉटसॲप ग्रुप दोन वर्षांपूर्वी निर्माण केलेला आहे. १०७ सदस्य असलेल्या या ग्रुपवर शैलजा पाटील व माधुरी पाटील यांनी पूरबाधित झालेल्या कणेगाव व भरतवाडीसाठी काहीतरी मदत करूया, असा प्रस्ताव ठेवल्यानंतर त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. उत्स्फूर्तपणे सहा दिवसांत एक लाख चोवीस हजार इतकी रक्कम गोळा झाली. यातून जीवनावश्यक वस्तूंचे साडेतीनशे किट तयार करण्यात आले. जवळजवळ ४० माहेरवाशिणींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून घरोघरी किट पोहाेचविले. किटमधून उरलेली दोन हजार रक्कम कणेगाव हायस्कूलकडे सुपूर्द करण्यात आली. याचे प्रातिनिधिक वाटप कणेगाव येथे राष्ट्रवादीचे राज्याचे संघटक सचिव, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील, लोकनियुक्त सरपंच ॲड. विश्वासराव पाटील, प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या छायाताई पाटील यांच्या हस्ते झाले.