लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : सांगली जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या अशासकीय सदस्यपदी विटा येथील ॲड. महेश सदानंद शानभाग यांची नियुक्ती करण्यात आली. ग्राहक मंचचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या.
ग्राहक हक्कांचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच समन्वय आणि संवादातून ग्राहक समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा पातळीवरील ग्राहक संरक्षण समितीच्या अशासकीय सदस्यांच्या तीन वर्षांसाठी निवडी जाहीर केल्या. यावेळी ग्राहक संघटना व संस्था प्रवर्गासाठी १०, शाळा व महाविद्यालये, वैद्यकीय व्यवसाय, व्यापार व उद्योग क्षेत्र, पेट्रोल व गॅस व्यवसाय आणि शेतकरी या प्रवर्गासाठी प्रत्येकी २ प्रतिनिधी अशा एकूण २० अशासकीय सदस्यांच्या निवडी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी जाहीर केल्या.
त्यात ग्राहक संघटना व संस्था प्रवर्गात विटा येथील ॲड. महेश शानभाग यांची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण समितीत ॲड. शानभाग यांच्या निवडीमुळे खानापूर तालुक्याला प्रथमच स्थान मिळाले आहे. ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करून ग्राहकांना न्याय देण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे ॲड. महेश शानभाग यांनी निवडीनंतर सांगितले.