सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या हत्याकांड प्रकरणात मांत्रिकास विषारी गोळ्या देणाऱ्या पुण्यातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यापैकी मनोज चंद्रकांत क्षीरसागर (वय-४८, रा.तळेगाव दाभाडे, पुणे) याला अटक केली आहे. मांत्रिकाच्या फरारी बहिणीचा पोलीस शोध घेत आहेत.
म्हैसाळ येथील डॉ. माणिक आणि पोपट वनमोरे यांना गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवून मांत्रिक बागवान याने त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली होती. बराच कालावधी होऊनही गुप्तधनाबाबत निर्णय होत नसल्याने वनमाेरे यांनी गुप्तधन काढून द्या किंवा घेतलेले पैसे तरी परत द्या असा तगादा बागवान याच्याकडे लावला होता. यातूनच त्याने वनमोरे कुटुंबीयांच्या खुनाचा कट रचला. यावेळी त्याने वनमोरे कुटुंबीयांना विषारी गोळ्यांची पावडर करून ती नऊ बाटल्यांमध्ये भरून त्यांना पिण्यास दिली होती.
मांत्रिक बागवान याने या विषारी गोळ्या पुण्यातून आणल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी पथके तयार करून चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गोळ्यांची माहिती घेतल्यानंतरच अधिक खुलासा होणार आहे. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यानुसार आता मांत्रिक बागवान याच्या बहिणीचाही शोध सुरू करण्यात आला आहे.