मिरज : गुप्तधन शोधण्यासाठी घेतलेेले पैसे परत देण्यासाठी तगादा लावल्यानेच विषारी द्रव पाजून मांत्रिकाने म्हैसाळ येथील नऊ जणांचे हत्याकांड केल्याचे निष्पन्न झाले आहे. हत्याकांडामध्ये मांत्रिक अब्बास बागवान याला विषारी गोळ्या देणारा व मांत्रिकाची बहीण हे दोघे पोलिसांच्या रडारवर आहेत. लवकरच या दोघांनाही अटक होण्याची शक्यता आहे.
म्हैसाळ येथील डाॅ. माणिक वनमोरे बंधूंनी गुप्तधनाच्या हव्यासातून कर्ज घेऊन मांत्रिकाला लाखो रुपये दिले होते. गुप्तधन न मिळाल्याने वनमोरे यांनी मांत्रिकाकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केली. पैशाच्या तगाद्यामुळे मांत्रिक बागवान याने वनमोरे कुटुंबीयांचा जीव घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. अब्बास बागवान हा त्याच्या सोलापूर येथे बहिणीच्या घरी राहत होता. त्या ठिकाणी पोलिसांना धागा बांधलेला नारळ, कवड्या, एक डोळा असलेला नारळ मिळून आले आहे. त्यामुळे अघोरी प्रकार करण्यासाठी मांत्रिकाला तिच्या बहिणीनेही मदत केल्याचा संशय आहे. म्हैसाळ हत्याकांडाची तिला माहिती होती का? याबाबतही तिच्याकडे चाैकशी करण्यात येणार आहे. बागवान भाऊ बहिणीने अघोरी जादूटोणा प्रकारातून किती संपत्ती मिळविली आहे? वनमोरे यांच्याकडून किती रक्कम घेतली आहे, याचीही मांत्रिकाच्या बहिणीकडे चौकशी केली जाणार आहे.
मांत्रिकाने हत्याकांडासाठी विषारी असलेल्या गोळ्यांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने त्या गोळ्या कोठून आणल्या, कोणी गोळ्यांचा पुरवठा केला आहे, याचाही तपास सुरू आहे. विषारी गोळ्यांची पूड करून त्याचे द्रव नऊ जणांना पाजण्यात आले . त्यामुळे विषारी गोळ्याचा पुरवठादार आता पोलिसांच्या रडारवर आहे. मांत्रिकाची बहीण हत्याकांड झाल्यापासून फरारी आहे. तिच्यासह विषारी गोळ्याच्या पुरवठादाराचा शोध सुरू असल्याने या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.