विटा : सीसी टीव्ही कॅमेरे फोडून बॅँक आॅफ बडोदाच्या माहुली (ता. खानापूर) शाखेचे एटीएम यंत्रच अज्ञात चोरट्यांनी पळविले. यावेळी चोरट्यांनी २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या एटीएम यंत्रासह ७ लाख ४८ हजार ६०० रुपये रोख रक्कम असा सुमारे ९ लाख ९८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री माहुली (ता. खानापूर) येथे घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. माहुली येथे बॅँक आॅफ बडोदाची शाखा आहे. येथील वसंत शामराव माने यांच्या मालकीचा गाळा बॅँकेने भाड्याने घेऊन त्यात डिसेंबर २०१३ पासून ग्राहकांसाठी एटीएमची सोय केली आहे. परंतु, या ठिकाणी वॉचमनच ठेवण्यात आलेला नाही. कवलापूर येथील बाबासाहेब पाटील हे चॅनेल व्यवस्थापक असून, त्यांच्या चॅनेलव्दारे या यंत्रामध्ये पैसे भरले जातात. या एटीएममध्ये दि. २७ जुलैरोजी सहा लाख रुपये भरले होते. त्यापूर्वीची शिल्लक १ लाख ५० हजार रुपये होती. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गाळ्याची काच खोलून बाजूला ठेवली. त्यानंतर त्यांनी सीसी टीव्ही कॅमेरे फोडून एटीएम यंत्राची सर्व्हरपासून केबल कापून चोरट्यांनी अडीच लाख रुपये किमतीच्या एटीएम यंत्रासह त्यातील रोख रक्कम चोरली. हा प्रकार रविवारी लक्षात आल्यानंतर चॅनेल व्यवस्थापक व बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती विटा पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सांगलीहून श्वानपथक आणण्यात आले. यातील श्वानाने विटा शहराकडे माग दाखविला. याप्रकरणी विटा पोलिसांत चॅनेल व्यवस्थापक बाबासाहेब पाटील यांनी फिर्याद दिली असून, पोलिस निरीक्षक मोहन जाधव पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
माहुलीतील एटीएम यंत्र पळविले
By admin | Published: August 01, 2016 12:19 AM