सांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भांडणात केंद्र आणि राज्यातील सरकार कोसळले. किमान आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सत्ता तरी टिकवून ठेवा, असा सल्ला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी दोन्ही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिला.‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’ व ‘वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कार’ प्रदान कार्यक्रम जिल्हा परिषदेत झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहनराव कदम बोलत होते. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष जनार्दन (काका) पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून जि. प. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर होत्या. मोहनराव कदम पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पहिल्या फेरीतच काम झाले पाहिजे. काम झाले नाही म्हणून तो रिकाम्या हाताने परत जाऊ नये. केंद्र आणि राज्यातून सत्ता गेली आहे. किमान, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची तरी सत्ता टिकवायची असेल, तर येणाऱ्या प्रत्येकाचे पहिल्या फेरीत काम झाले पाहिजे अशी सूचनाही त्यांनी दिली.विलासराव शिंदे, रेश्माक्का होर्तीकर यांचीही भाषणे झाली. यावेळी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, सभापती गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, शिक्षणाधिकारी मधुकर यादव, नीशादेवी वाघमोडे, सुगता पुन्ने, कक्ष अधिकारी सुनील माळी, एम. वाय. पाटील आदींसह अधिकारी, सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेतील तरी सत्ता टिकवून ठेवा
By admin | Published: January 23, 2015 11:22 PM