लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दोन वर्षांपूर्वी महापुरावेळी शहरातील पाणी पुरवठा विखंडित झाला होता. पाणी पुरवठा सुरळीत करण्यास प्रशासनाला कष्ट घ्यावे लागले होते. यंदा पुराच्या काळात शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना उपायुक्त राहुल रोकडे यांनी मंगळवारी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेच्या काका नगर येथील पाणी पुरवठा जॅकवेल व पंपगृहाची रोकडे यांनी पाहणी केली. पाणी पुरवठा यंत्रणेला सज्ज राहण्याची सूचना करीत रोकडे यांनी मागील महापुराच्या काळात आलेल्या अडचणीची माहिती घेतली. संभाव्य पूरस्थिती उद्भवली तर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही, याबाबत आतापासूनच योग्य त्या दक्षता घ्या, जॅकवेलच्या यंत्रसामग्रीची दुरुस्ती, अन्य तांत्रिक कामेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबतचे आदेशही दिले. यावेळी आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वृक्ष अधिकारी गिरीश पाठक, पाणी पुरवठा अभियंता अभय पोळ, प्रमोद रजपूत आणि कर्मचारी उपस्थित होते.