नेवरी : शेतकऱ्यांनी टेंभू व ताकारीचे पाणी काटकसरीने वापरावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेती उत्पादन वाढविण्यासाठी केला पाहिजे. शेतीला पाणी देण्याच्या पध्दतीत बद्दल करून पिकाला आवश्यक आहे. तेवढचे पाणी ठिंबक सिंचनाव्दारे देणेत यावे यासाठी कारखान्याकडून ठिंबक सिंंचन संच व मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन केन अॅग्रोचे अध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले.रायगाव (ता. कडेगाव) येथील केन अॅग्रो एनर्जी (इंडिया) लि. या साखर कारखान्याच्या सन २०१५-१६ मध्ये उत्पादीत झालेल्या एक लाख अकरा हजार एकशे अकराव्या साखर पोत्याचे पूजन देशमुख यांचेहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी देशमुख म्हणाले की, कारखान्याचे विस्तारीकरण केल्यामुळे प्रतिदिनी ३७०० ते ३८०० च्या दरम्यान ऊस गाळप होत आहे. गाळप क्षमतेचा वापर करून गाळप वाढविणे गरजेचे आहे. आजपर्यंत केन अॅग्रो साखर कारखान्याने २७ दिवसामध्ये १ लाख २००० टन गाळप करून १ लाख ११ हजार १११ साखर पोती उत्पादन केले आहे. आपल्या कारखान्याचा सरासरी साखर उतारा १०.८९ टक्के आहे. कारखाना परिसरातील सर्व ऊस उत्पादकांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवावा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयकर पाटील यांनी स्वागत केले. यावेळी दत्तात्रय सूर्यवंशी, वसंतराव गायकवाड, युवराज सावंत, शंकरराव पाटील, शिवाजीराव देशमुख, लक्ष्मण डांगे, रामचंद्र घार्गे, लक्ष्मण कणसे, विजय करांडे, धनंजय देशमुख, धोंडीराम महिंद, हणमंतराव कदम, शशिकांत घाडगे, अॅड. सर्जेराव चव्हाण, भिलवडीचे सरपंच सुरेंद्र वाळवेकर, रामानंदनगरचे सरपंच दीपक मोहिते, रणजित यादव, सुनील गाढवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
ताकारी, टेंभू योजनेचे पाणी जपून वापरा
By admin | Published: December 14, 2015 11:58 PM