मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) गुप्तधनाच्या आमिषाने मोठी रक्कम उकळून नऊ जणांच्या हत्याकांड प्रकरणाचा मुख्य आरोपी मांत्रिक अब्बास बागवान याची बहीण जैतुनबी उर्फ जैतुबाई महंमद हनीफ बागवान (वय 60) हिने गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्याची याचिका सत्र न्यायालयात दाखल केली आहे.गुप्तधन मिळवून देण्याच्या बहाण्याने मांत्रिक बागवान याने वनमोरे कुटुंबाकडून सुमारे साठ लाख रुपये घेतले होते. गुप्तधन न मिळाल्याने वनमोरे कुटुंबाने मांत्रिक बागवान यांच्याकडे दिलेले पैसे परत देण्यासाठी तगादा लावल्याने मांत्रिक बागवान याने विष प्रयोग करून वनमोरे कुटुंबियांचे हत्याकांड घडवून आणले .मांत्रिक अब्बास बागवान याने वनमोरे कुटुंबिकडून घेतलेली रक्कम ही जैतुनबी बागवान हिच्या खात्यावर ठेवली होती. तिला या प्रकरणाची माहिती असल्याने तिलाही या प्रकरणी सहआरोपी करण्यात आले आहे. दोघेही भाऊ बहिण कारागृहात आहेत. या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही, मी अशिक्षित आहे, मला बँकेचे व्यवहार कळत नाहीत. यामुळे या गुन्ह्यातून माझी मुक्तता करावी. अशी याचिका जैतुनबी बागवान हिने न्यायालयात केली आहे. मांत्रिक अब्बास बागवान यास गुन्ह्यात मदत केली असल्याने जैतुनबी बागवान हिची या गुन्ह्यातून मुक्तता करु नये अशी सरकार पक्षाने मागणी केली आहे. यावर आता न्यायालयात सुनावणी होणार आहे.
म्हैसाळ हत्याकांड प्रकरण: मांत्रिकाच्या बहिणीची गुन्ह्यातून मुक्ततेसाठी याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 3:56 PM