सांगली : जिल्ह्यात मक्याचे उत्पादन जास्त असले तरी, ते लष्करी अळीमुळे ४० टक्क्यांपर्यंत घटले आहे. यामुळे मक्यास हमीभावापेक्षा दीडपट म्हणजे प्रतिक्विंटल ८४० रुपये जादा दर मिळत आहे. केंद्र शासनाने २०१९-२० या वर्षासाठी मक्याचा हमीभाव प्रतिक्विंटल १७६० रुपये जाहीर केला असून, सध्या दहा वर्षातील विक्रमी प्रतिक्विंटल २५५० ते २६०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.सांगली जिल्ह्यात खरीप हंगामातील मक्याचे उत्पादन सरासरी ३० हजार ३१० हेक्टर आहे. यापैकी जिल्ह्यात प्रत्यक्ष ३५ हजार २४४ हेक्टरवर पेरणी झाली होती. जवळपास ११६ टक्क्यांनी जादा मक्याचे क्षेत्र होते. कमी कालावधित आणि कमी पाण्यात जादा उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी मका पिकाकडे वळला आहे.
यावर्षी मका पिकावर लष्करी अळीचे मोठे संकट आले आहे. आटपाडी, मिरज, वाळवा, पलूस तालुक्यातील शेकडो एकरावरील मका पीक उद्ध्वस्त झाले आहे. पिकावरील लष्करी अळी अत्यंत विध्वंसक कीड आहे. आफ्रिका खंडासह संपूर्ण भारत, चीन, फिलिपाईन्स या देशांमध्ये या किडीने मोठे नुकसान केले असून, तेथे मक्याचे २० ते ६० टक्के नुकसान झाल्याच्या नोंदी आहेत.
देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मक्याचे उत्पन्न घटले आहे. यामुळे मक्याचे दर तेजीत राहणार आहेत. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, पलूस, कडेगाव तालुक्यात मक्याचे उत्पादन जास्त आहे. पण, लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील उत्पादन ३० ते ४० टक्क्यापर्यंत घटले आहे.सांगली बाजार समितीचे सचिव विजयसिंह राजेशिर्के म्हणाले, मक्याचे क्षेत्र जास्त असले तरी, लष्करी अळीमुळे उत्पादन घटल्यामुळे दर वाढले आहेत. दि. ३० सप्टेंबरच्या सौद्यामध्ये मक्याला प्रतिक्विंटल २५०० ते २६०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. गेल्या दहा वर्षांतील विक्रमी दर असल्याचे त्यांनी सांगितले.