लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून काढणी झाललेल्या ज्वारी, हरभरा या पिकांसह झेंडूचीही हानी झाली आहे. तासगाव तालुक्यात सावळज, डोंगरसोनी येथे वादळी वाऱ्याने चार द्राक्षबागा कोसळून सुमारे ३५ लाखाचे नुकसान झाले.
सांगली शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी मध्यरात्री विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सांगली, मिरजेसह कवठेमहांकाळ, तासगाव, इस्लामपूर येथे मध्यम स्वरुपाचा तर जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव परिसरात तुरळक सरी कोसळल्या. शिराळ्यात केवळ ढगांची दाटी होती. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने पिकांच्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यामध्ये द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काहीठिकाणी मणी फुटून तर काही ठिकाणी बागा कोसळून नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. येत्या दोन दिवसात नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल.
तासगाव तालुक्यात सावळज येथे नितीन शिवाजी तारळेकर यांची एस.एस. एन जातीची सुमारे पाऊण एकर द्राक्षबाग कोसळून अंदाजे ८ ते ९ लाखाचे, डोंगरसोनी येथील शेतकरी रमेश ज्ञानोबा झांबरे यांची सुपरसोन्नाका जातीची एक एकर द्राक्षबाग कोसळून ८ ते १० लाखाचे, डोंगरसोनीचेच प्रकाश हंबीरराव पवार यांच्या दीड एकर बागेचे कोसळून दहा लाखाचे तर याच गावातील तुळशीराम हंकारे यांची १ एकर बाग कोसळून ७ लाखाचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यापासूनच शेतकऱ्यांनी बागा वाचविण्यासाठी धडपड सुरू केली होती. यात काहींना काही प्रमाणात यश मिळाले, मात्र काहींना नुकसानीचा सामना करावा लागला.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारी रात्रीही पावसाची चिन्हे असून शुक्रवारी ढगांची दाटी कायम राहणार आहे. वादळी वाऱ्याचीही शक्यता आहे. शनिवारी वातावरण अंशत: ढगाळ, तर रविवारी २१ फेब्रुवारीस आकाश निरभ्र होणार आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस शेतकऱ्यांसाठी काळजीचे दिवस राहणार आहेत.
चौकट
व्यापाऱ्यांनीही दर पाडले
द्राक्षबागायतदार संघाचे माजी अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी सांगितले की, अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यापासूनच व्यापाऱ्यांनी दर पाडण्यास सुरुवात केली होती. आता प्रत्यक्षात पावसाने द्राक्षबागांच्या नुकसानीच्या घटना समोर येत आहेत. नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज अद्याप आलेला नाही, मात्र निश्चितपणे नुकसान झाले आहे.
चौकट
ज्वारीच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ज्या पिकांची काढणी होऊन पीक आडवे केले आहे ती ज्वारी आता भिजून काळी पडण्याची चिन्हे आहेत.
फोटो आहेत..