सांगली : महापालिकेत वर्षानुवर्षे काम करणारे बदली कामगार, कंत्राटी तसेच रोजंदारीवरील कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. तरीही महापालिकेने फेरप्रस्ताव सादर करावा. पुढील आठवड्यात त्यास मान्यता मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू, असे आश्वासन कामगार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले.महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शनिवारी खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त स्मृती पाटील, माजी सभापती सुरेश आवटी आदी उपस्थित होते. महापालिका कामगार युनियनचे सचिव विजय तांबडे यांनी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली.यावर मंत्री खाडे म्हणाले की, आपल्या बैठकीपूर्वीच महापालिकेने कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला आहे. तो प्रस्ताव शासन दरबारी असला तरी तोच प्रस्ताव महापालिका प्रशासनाने पुन्हा शासनाकडे सादर करावा. पुढील आठवड्यात संबंधित विभागाशी चर्चा करून प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू. आयुक्त पवार यांनीही महापालिका प्रशासनाने कामगारांच्या बाजूने असून कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी कामगारांच्या वतीने विजय तांबडे व कामगारांनी पालकमंत्री खाडे यांचा सत्कार केला.
बालवाड्यांचे अंगणवाडीत रूपांतरमहापालिका क्षेत्रात असणाऱ्या ६४ बालवाड्या या शासन आदेशानुसार अंगणवाडीत रूपांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही पालकमंत्री खाडे यांनी महापालिका प्रशासनाला केली. महापालिका कर्मचारी समायोजन आणि बालवाडीचे अंगणवाडीत समायोजन यांचा निर्णय एकाचवेळी घेऊ, असे खाडे म्हणाले.
विम्याचा ४० लाखांचा धनादेश प्रदानअपघातात मृत्युमुखी पडलेले महापालिकेचे कर्मचारी रवींद्र केसरे यांच्या कुटुंबीयांना विम्याची ४० लाखांची मदत देण्यात आली. पालकमंत्री सुरेश खाडेंच्या हस्ते केसरे यांच्या पत्नीला धनादेश सुपूर्द करण्यात आला.