सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे तीन आठवड्यापूर्वी अपघातात ठार झालेल्या सागर नामदेव गावडे (वय २६, रा. कुमठे, ता. तासगाव) या तरुणाचा खून झाल्याची घटना सांगली ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी उत्तम आनंदा गावडे (रा. रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व गणेश विठ्ठल बर्गे (रा. कवलापूर, ता. मिरज) या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम याच्या अनैतिक संबंधाची वाच्यता केल्याच्या रागातून अपघाताचा बनाव करून सागरचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ३ फेब्रुवारी रोजी कवलापूर हद्दीत एका तरूणाचा अपघात झाल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, कुमठे येथील सागर नामदेव गावडे हा तरूण कवलापूर ते कुमठेफाटा रस्त्यावरील कोष्टी मळ्याजवळ रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत आढळून आला. त्याची मोटारसायकल रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला होती. सागर याच्या डोक्याला मार लागला होता. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. सागर याचे चुलते विश्वनाथ आनंदा गावडे यांनी फिर्याद दिली. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी मृत सागरचे वडील नामदेव, आई मालन, पत्नी प्रियंका यांच्याकडे चौकशी केली असता, चौकशीत या कुटुंबाने त्याच्या घातपाताचा संशय व्यक्त केला. सागर हा रेंदाळ येथील उत्तम आनंदा गावडे याच्याकडे दोन महिन्यापासून कामाला होता. उत्तम याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. सागरसोबतच गणेश बर्गेही तिथेच कामाला होता. या दोघांनी अनैतिक संबंधाची वाच्यता केल्याच्या रागातूनच घातपात केला असावा, असा संशय व्यक्त केला. ग्रामीण पोलिसांनी उत्तम गावडे व गणेश बर्गे याला चौकशीसाठी बोलाविले. या दोघांवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. त्यांच्या जबाबात विसंगती आढळल्याने त्यांचे जबाब नोंदवून त्यांना १० फेब्रुवारी रोजी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देऊन सोडण्यात आले. या दोघांच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी तपासले, असता, त्यात उत्तम हा घटनेदिवशी सायंकाळच्या सुमारास दुधगाव परिसरात असल्याचे आढळले, तर गणेश बर्गे याचा मोबाईल त्यादिवशी बंदच होता. त्यामुळे संशयितांवर पोलिसांचा अधिकच संशय बळावला. त्यानंतर हे दोघेही गायब झाले आहेत. आजअखेर ते पुन्हा चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आले नाही. पोलिसांनी या दोन संशयितांच्या घराची झडती घेतली. पण ते मिळून आले नाहीत. बुधवारी पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद देत, सागर याच्या खूनप्रकरणी उत्तम गावडे व गणेश बर्गे या दोघांविरूद्ध, त्यांनी अपघाताचा बनाव करून खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही संशयित फरार आहेत. (प्रतिनिधी)पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघडकीस सागर गावडे या तरुणाचा खून इतर ठिकाणी करून त्याचा मृतदेह कवलापूर रस्त्याकडेला आणून टाकण्यात आला होता. अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचा बनावही रचला होता. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे खुनाच्या घटनेला वाचा फुटली आहे. त्याच्या कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता वर्तविल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा घटनास्थळी केलेल्या पंचनाम्याची तपासणी केली. यात घटनास्थळी कोणतेही टायर मार्क तसेच मोटारसायकलव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वाहनांचे अस्तित्व आढळून आले नाही. घटनास्थळी रक्तही पडलेले नव्हते. शिवाय मृत सागर याच्या शवविच्छेदन अहवालात डोक्याच्या मधोमध गंभीर जखम होती. ही जखम कठीण व बोथट हत्याराने केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली.
खून करून अपघाताचा बनाव
By admin | Published: March 01, 2017 11:57 PM