सांगली : केंद्र आणि राज्याच्या शिखरावरील भाजपचे सरकार कायम ठेवायचे असेल, तर कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात पक्षाचा पाया मजबूत केला पाहिजे. त्यासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही एक चांगली संधी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी सांगलीत केले. देश, राज्याप्रमाणे मिरज तालुकाही कॉँग्रेसमुक्त करा, असे आवाहनही त्यांनी केले. मिरज तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा गुरुवारी सांगलीत झाला. यावेळी पालकमंत्री देशमुख बोलत होते. मेळाव्यास खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, माजी आमदार दिनकर पाटील, दीपक शिंदे-म्हैसाळकर, शेखर इनामदार उपस्थित होते. देशमुख म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साथ देत देश काँग्रेसमुक्त झाला आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीतूनही काँग्रेसला हद्दपार करा. मिरज तालुक्याचा सभापती भाजपचा झाला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी जिद्दीने कामाला लागावे. काँग्रेसमुक्त मिरज तालुका, असा नारा देत कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत भाजप सरकारची कामे पोहोचविली पाहिजेत. सरकार चांगले काम करीत असताना, केवळ २० टक्के लोकच सरकारविरोधी व्यक्तव्ये करतात. त्यात काळापैसावाले, भ्रष्टाचारी लोकांचाच समावेश आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आतापर्यंत नेत्यांसाठी कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले आहे. त्यामुळे नेत्यांनीही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहावे, त्यांना वाऱ्यावर सोडू नये. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, जिल्ह्यात भाजपला पोषक वातावरण आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून त्याचा अहवाल प्रदेश समितीकडे पाठविला आहे. प्रदेश समितीकडून मतदार संघाचा सर्व्हे सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर ३० जानेवारीपर्यंत उमेदवारांची यादी अंतिम केली जाईल. जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता येईल. श्रीकांत शिंदे, मुन्ना कुरणे, भारती दिगडे, बीरेंद्र थोरात, विक्रम पाटील-सावर्डेकर, ओंकार शुक्ल यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मिरज तालुका काँग्रेसमुक्त करा
By admin | Published: January 27, 2017 11:29 PM