फोटो ओळ : कळुंद्रे (ता. शिराळा) येथे पूरग्रस्त भागाची माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : मागील पुराच्या वेळी अनेक त्रुटी राहिल्याने अडचणी आल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने वस्तुनिष्ठ पंचनामे करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन रणधीर नाईक यांनी केले.
काळुंद्रे (ता. शिराळा) येथे वारणा नदीच्या पुरामुळे व पाचगणीकडून आलेल्या खराडी ओढ्याच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. काळुंद्रे येथील ४० घरांमध्ये पाणी शिरल्यानेही नुकसान झाले आहे. या परिसराची पाहणी करून अधिकारी पंचनामे व फॉर्म भरून घेत आहेत. याची माहिती रणधीर नाईक यांनी घेतली.
ते म्हणाले, वारणा नदीला आलेल्या पुराने शेतीसह घरांचे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना योग्य भरपाई मिळण्यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, तसेच पूरग्रस्त गावातील प्रमुख नागरिकांनी पंचनामे करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असेही आवाहन नाईक यांनी केले आहे.
यावेळी आनंदराव पाटील, संजय पाटील, दीपक गुरव, संभाजी सुतार, राजेश पाटील, अशोक पाटील, आनंदा पाटील, बाजीराव देसाई, प्रकाश देसाई आदी उपस्थित होते.