लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयातील शासकीय यंत्रणा रात्रंदिवस राबत आहे. हे कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्यावर तात्काळ उपचार व्हावेत, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष जे. के. महाडिक आणि विभागीय सचिव पी. एन. काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली.
ते पुढे म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता शासकीय अधिकारी व कर्मचारी योगदान देत आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, बेड उपलब्ध होणे, वेळेत उपचार होणे आवश्यक आहे. कर्मचारी अथवा अधिकारी कोरोनाबाधित झाल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना वेळेत उपचार मिळण्यासाठी ऑक्सिजन व व्हेन्टिलेटरची सुविधा असलेले स्वतंत्र कोविड रुग्णालय उपलब्ध व्हावे, जेणेकरून शासकीय अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना बेडसाठी व उपचारासाठी वाट पाहावी लागणार नाही. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांना देण्यात आले.