फोटो ओळी- बोरगाव, साटपेवाडी येथे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी माणिकराव पाटील, रूपाली सपाटे, विजयसिंह देशमुख, शशिकांत शिंदे, नारायण देशमुख, डॉ. साकेत पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : कोरोनाची संख्या घटवायची असेल, तर कोणकोणत्या पक्षांचा पाहू नका. नियमांचे पालन करत नसेल, त्याला ज्या भाषेत सांगायची गरज आहे, ती वापरा. भले त्यात वाईटपणा आला, तरी चालेल. मात्र, आज आपल्याला गाव वाचवायचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकमताने कठोर निर्णय घ्यायला हवेत, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
बोरगाव व साटपेवाडी (ता. वाळवा) येथील संपर्क दौऱ्यात ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, कोरोनाबाधित व्यक्ती रस्त्यावर फिरायला लागला, तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा. तसेच जे कुटुंब कोरोनाबाधित झाले आहे, त्यांच्या घरासमोर फलक लावा. ते फाडून टाकत असतील तर एक वेळ दुर्लक्ष करा, पण दुसऱ्यावेळी तो फलक फाडला तर मात्र कारवाई करा.
यावेळी प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पंचायत समिती सदस्या रूपाली सपाटे, संजय पाटील आदी उपस्थित होते.