मिरज : मिरज तालुक्यातील मालगाव येथे बारा जणांच्या टोळीने मळाभागात तीन ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकला. तलवारीचा धाक दाखवत महिलेसह दोघांना मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा पाच लाखाचा ऐवज लुटण्यात आला. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. चोरट्यांनी दोन ठिकाणी मोठ्या दगडाने घराचे दरवाजे फोडले. एकाच रात्रीत तीन ठिकाणी लूटमारीच्या घटना घडल्यामुळे मळाभागातील नागरिकांत घबराट पसरली आहे.बुधवारी मध्यरात्री दीड ते अडीचपर्यंत नाईट पँट, तोंडाला काळा रूमाल बांधलेल्या बारा सशस्त्र दरोडेखोरांनी मालगाव परिसरात तीन ठिकाणी धाडसी दरोडा टाकला. तानंग हद्दीत केंपवाडकर मळा येथे गणपती मंदिराजवळ राहणारे महादेव लिंगाप्पा कारंडे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला. पण कारंडे कुटुंबीय जागे झाल्याने चोरट्यांनी मिरज-पंढरपूर रोडवरील मरूधर हॉटेलसमोरील प्रफुलभाई राउजीभाई घेटीया यांच्या फार्म हाऊसकडे मोर्चा वळविला.फार्म हाऊसमध्ये देखभालीसाठी वास्तव्यास असलेले रमेश बापूसाहेब सूर्यवंशी यांच्या घराचा दरवाजा उघडण्यासाठी चोरट्यांनी फार्म हाऊसवर बांधकामासाठी आणलेल्या दगडातील सुमारे पंचवीस किलो वजनाच्या मोठ्या दगडाने दरवाजाला भगदाड पाडले. घरातील रमेश सूर्यवंशी (वय ३५) व त्यांच्या पत्नी कोमल सूर्यवंशी (२८) यांना तलवार व चॉपरचा धाक दाखवित कोमल सूर्यवंशी यांच्या अंगावरील गंठण, अंगठी व लहान मुलाचे पैंजण, तोडे या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पाच हजार रुपये काढून घेतले. दागिने देण्यास विरोध केल्याने कोमल सूर्यवंशी यांना चोरट्यांनी मारहाण केली.चोरट्यांनी तेथून जवळच असलेल्या चव्हाण वस्तीवर एकाच इमारतीत राहणाऱ्या विजय चव्हाण (३५) व नंदकुमार चव्हाण (५७) या काका-पुतण्याच्या घरांचा दरवाजा दगडाने फोडून आत प्रवेश केला. दोन्ही घरात तलवारीचा धाक दाखवत चोरट्यांनी तिजोरीतील गंठण, मंगळसूत्र, अंगठी, पैंजण, तोडे, वाळे अशा सोन्या-चांदीच्या आठ तोळे दागिन्यांसह दोन्ही घरातील पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम पळविली. विरोध करणाºया विजय चव्हाण यांना चोरट्यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.दरोड्याच्या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अनिल पोवार, निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांच्या शोधासाठी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने चव्हाण यांच्या घरापासून पंढरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपापर्यंत व सूर्यवंशी यांच्या घरापासून मालगाव रस्त्यावरील जाधव वस्तीपर्यंत चोरट्यांचा माग काढला. तेथून चोरटे वाहनाने पसार झाल्याचा संशय आहे.याप्रकरणी रमेश सूर्यवंशी यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली असून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालगावात दरोडा; पाच लाखाचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:17 PM