सांगली : सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली सातारा - कोल्हापूर पॅसेंजर सध्या प्रवाशांची जणू सत्वपरीक्षा पाहत आहे. शुक्रवारी गाडीची ब्रेकिंग यंत्रणा निकामी झाल्याने ती हातकणंगले स्थानकात अडकून पडली. 40 किलोमीटर प्रतितास गतीने कशीबशी कोल्हापूरपर्यंत नेण्यात आली.बिघाडामुळे तब्बल दीड तास उशिरा कोल्हापूरात पोहोचली, त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. हातकणंगले स्थानकात रीतसर तक्रार नोंदवली. गेल्या काही दिवसापासून गाडीमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याचे सांगितले. शुक्रवारी सकाळी साडेआठ या नियमित वेळेत पॅसेंजर मिरज स्थानकात आली. तेथून पुढे जयसिंगपूरमध्येही प्रवाशांनी तुडुंब भरली. त्याचवेळी बिघाड सुरु झाला. इंजिनमधील कॉम्प्रेसर नादुरुस्त झाल्याने ब्रेकींग यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करेना झाली. मोटामनने गाडीची गती 90 वरून अवघ्या 40 किलोमीटर प्रतितासवर आणली. जयसिंगपूर ते हातकणंगले या प्रवासाला तब्बल अर्धा तास लागला.गाडीचा खेळखंडोबा पाहून हातकणंगले स्थानकात प्रवासी आक्रमक झाले. चालक, गार्ड आणि स्थानक अधीक्षकांना जाब विचारला. तक्रार पुस्तिकेत रीतसर तक्रार नोंदवली. अखेर चालकाने तशीच रडतरखडत पॅसेंजर कोल्हापूरपर्यंत नेली.प्रवाशांनी सांगितले कि, अवघ्या सात डब्यांची लाल डेमू सातत्याने नादुरुस्त होत आहे. मिरजेतून सव्वा तासांच्या कोल्हापूर प्रवासाला दोन -अडीच तास घेत आहे. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी यांचे नुकसान होत आहे. पुणे विभागाकडून मिरज सेक्शनला भंगार गाड्या दिल्या जात आहेत. गाडीत उभे राहण्यासही जागा नसते, तरीही डबे वाढविले जात नाहीत. अशीच स्थिती राहिली तर प्रवासी गाड्या रोखून धरतील.
पॅसेंजर नव्हे, मुंबईची लोकलसातारा कोल्हापूर पॅसेंजरची क्षमता हजारभर प्रवाशांची असताना अडीच हजार प्रवासी शेळीमेंढराप्रमाणे प्रवास करतात. तरीही डबे वाढविण्याकडे रेल्वेचे दुर्लक्ष आहे. ही पॅसेंजर म्हणजे मुंबईची लोकल झाली आहे.