लोकमत न्यूज नेटवर्क
पलूस : मामासाहेब पवार सत्यविजय बँकेने सभासदांच्या सर्व गरजा पतपुरवठ्याद्वारे पूर्ण करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. बँक यापुढेही सभासदांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार यांनी दिली.
कुंडल (ता. पलुस) येथील मामासाहेब पवार सत्यविजय को. ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, बँक आर्थिक वर्षात अनेक अडचणींवर मात करत सदैव कामात अग्रभागी राहिली आहे. महापूर व कोरोनाच्या संकटात बँकेच्या अनेक सभासदांचे मोठे नुकसान झाले. त्यातूनही मार्ग काढत बँकेने सभासदांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेत त्यांना आधार दिला. बँकेचे संस्थापक क्रांतिवीर मामासाहेब पवार यांनी सामान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम बँकेच्या स्थापनेपासून केले आहे. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हीही काम करत आहोत. लवकरच अंकलखोप (ता. पलुस) येथे बँकेची शाखा सुरू करणार असल्याचे सांगितले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष दिलीपराव नलावडे, संचालक ॲड. प्रशांत पवार, क्रांती साखर कारखान्याचे संचालक आर. के. सावंत, गुरूकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पवार, बँकेचे संचालक धोंडीराम पाटील, विकास लाड, रावसाहेब वाकळे, रमेश चव्हाण, संतोष गायकवाड, एस. एम. पाटील, ॲड. विकास पाटील उपस्थित होते. बँकेचे संचालक चंद्रकांत कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक सी. व्ही. कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले. बाबासाहेब पवार यांनी सूत्रसंचालन केले तर रमेश चव्हाण यांनी आभार मानले.