कुपवाड : मिरज एमआयडीसीतील विजया इंडस्ट्रीज या कंपनीतील परप्रांतीय कामगार राजेशकुमार उमेश राऊत व त्याचा मित्र पुनीलाल या दोघांना धमकी देऊन पैशाची मागणी केली. यावेळी त्यांच्याजवळ पैसे नसल्याने त्यांच्याकडील दोन मोबाईल काढून घेऊन फरार झालेल्या एका संशयितास कुपवाड पोलिसांकडून मुद्देमालासह अटक करण्यात आली. तसेच याप्रकरणी दोन अल्पवयीन तरुणांनाही ताब्यात घेतले आहे.
इरफान गुडूलाल विजापुरे (वय १९, रा. भारतनगर, मिरज) असे अटक केलेल्या एका संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी कंपनी बंद असल्याने राजेशकुमार व पुनीलाल हे दोन कामगार कंपनीच्या आवारात थांबले होते. यावेळी संशयित इरफान विजापुरे व त्याचे दोन अल्पवयीन साथीदार असे तिघेजण मोटारसायकलवरून (एमएच १०,सी.जे. - ५८९९) कंपनीच्या आवारात आले. तिघांनी या परप्रांतीय कामगारांना धमकी देऊन पैशाची मागणी केली. यावेळी त्याच्याजवळ पैसे नसल्याने दोघांचे मोबाईल हिसकावून घेऊन मोटारसायकलीवरून तिघेही पसार झाले. त्यानंतर राजेशकुमार यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी पोलिसांची दोन पथके तयार करून संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने दोन संशयित बालगुन्हेगारांना जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथून ताब्यात घेतले; तर एका पथकाने मुख्य संशयित इरफान याला मिरजेतून अटक केली आहे.