लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : माळवाडी (ता. पलूस) येथील शेतकरी व मंडप व्यावसायिक शौकत हशम जमादार (वय ४५) यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला.
शुक्रवारी दुपारी शौकत जमादार हे त्यांच्या शेतामध्ये पिकांना पाणी देण्यास गेले होते. दुपारी २ वाजता त्यांनी पाटकऱ्यास पाणी संपल्याने बंद करण्यास फोनवरून सांगितले. त्यांच्या बांधालगत श्रीकांत कृष्णा पवार (रा. खंडोबाचीवाडी) यांच्या शेतात विहीर आहे. या विहिरीवरील पंपाला वीज जोडणी घेण्यास विजेचा पोल उभारण्यात आला आहे. या पोलची तारेची ओढण विहरीकाठावरील बांधकामाला जोडली आहे. या तारेच्या ओढणीवरून विहिरीमध्ये पाहताना शौकत यांचा तारेला चिकटून बसून जागीच मृत्यू झाला. श्रीकांत पवार हे त्यांच्या शेतामध्ये पाणी देत होते. पाणी बंद झाल्याने ते विहिरीकडे पाहण्यासाठी गेले. त्यावेळी शौकत हे तारेच्या ओढणीस चिकटून बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ भिलवडी येथील महावितरणचे कर्मचाऱ्यांना कल्पना दिली. महावितरणचे कर्मचारी, तलाठी, पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत भिलवडी पोलीस ठाण्यात वर्दी देण्यात आली. शौकत जमादार हे भिलवडी परिसरातील मंडप व डॉल्बी व्यावसायिक म्हणून परिचित होते. अतिशय कष्टाने त्यांनी आपला व्यवसाय नावारूपास आणला होता. त्यांच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, आई, वडील व भाऊ, असा परिवार आहे.