लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा जिल्ह्यातील बळिराजाही गुरुवारी विविध न्याय मागण्यासाठी प्रथमच संपावर गेला. ग्रामीण भागातून शेतकरी कृषिमाल घेऊन साताऱ्यात आले नाही. त्यामुळे दुपारपर्यंत मंडई ओस पडली होती. त्याचवेळी आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, तासवडे, आनेवाडी टोलनाक्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दुधाच्या टँकरसोबत पोलीस गाड्यांचा ताफाही देण्यात आला होता.जिल्ह्यात सर्वत्र सकाळपासून शांततेत आंदोलन सुरू होते. त्याचवेळी दुपारी बाराच्या सुमारास खटाव येथील ग्रामपंचायत चौकात काही कार्यकर्त्यांनी दुधाचे टँकर रस्त्यावर ओतून दिले. त्याचप्रमाणे कऱ्हाडमध्येही दूध ओतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी कऱ्हाड पोलिस ठाण्यात सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. पुणे, मुंबई महानगरातील नागरिकांना शेतकऱ्यांच्या कष्टाची झळ समजावी यासाठी कृषिमाल रोखून ठेवण्याचा चंग काही शेतकरी संघटनांनी बांधला. तसेच शेतकरी संघटनांची आजवरची आंदोलने गनिमी काव्याने होतात, हा इतिहास असल्याने पोलिसांनी चोख खबरदारी घेतली होती. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हाड तालुक्यातील तासवडे व जावळी तालुक्यातील आनेवाडी टोलनाक्यावर वीस-पंचवीस दूध टँकर एकत्र घेऊन पोलिस बंदोबस्तात ते मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले. ---------दूध ओतणाऱ्या आठजणांना अटककऱ्हाड : बळीराजा शेतकरी संघटना व किसान क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना शेतमालाचे व दुधाचे नुकसान केल्याप्रकरणी कऱ्हाड तालुका पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरूवारी सकाळी करण्यात आली.बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, सचिन बागट, उत्तम साळुंखे, आण्णा शिंदे, सूरज पाटील, विश्वास जाधव, साजिद मुल्ला, बाबूराव मोहिते व इतर चार ते पाच जण अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी गुरुवार, दि. १ पासून संप सुरू केला आहे. शहराकडे जाणारा भाजीपाला आणि दूध पुरवठा रोखण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा देत तसेच दुधाची पिकअप जीप (एमएच ५०-५७७५) मधील दूधाचे कॅन रस्त्यावर ओतून दुधाची व शेतमालाची नासाडी केली. याप्रकरणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि किसान क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.
मंडई ओस... महामार्गावर बंदोबस्त!
By admin | Published: June 01, 2017 11:10 PM