विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्यात अत्यंत दुर्गम भागात वसलेले चारशे ते साडेचारशे लोकसंख्या असलेल्या मणदूर - धनगरवाडा (ता. शिराळा) गावाने दारूबंदीचा ४५ वा वर्धापनदिन लोकोत्सव स्वरूपात साजरा केला. १९८० साली गुढीपाडव्याला गावातील काही वरिष्ठांनी श्री शेवताई देवीच्या मंदिरात नारळावर हात मारून शपथ घेतली दारू प्यायची नाही. या शपथेचा आता इतिहास घडला आहे. या घटनेची आठवण ठेवत गावकरी दरवर्षी गुढीपाडव्याला धार्मिक कार्यक्रम घेत लोकोत्सवच साजरा करीत आहेत.१९८० मध्ये धोंडिबा डोईफोडे, साकृ डोईफोडे, कोंडिबा डोईफोडे, भैरू डोईफोडे, दिनकर शेटके, बाळकू डोईफोडे, नामदेव जोवरे, धोंडीबा लंबोड, बाबूराव डोईफोडे, आदी मंडळी गुढीपाडव्यादिवशी पारावर दारूमुळे आपल्यातील काही कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे, याची चर्चा करत होती. अखेर यावर थेट दारूबंदीचाच निर्णय त्यांनी घेतला.
सर्व गावातील मंडळी ग्रामदैवत श्री शेवताईच्या मंदिरात गेले, त्याठिकाणी नारळावर हात ठेवून सर्वांनी दारू न पिण्याची शपथ घेतली. कोणी दारू पिली तर त्यास असहकार्य करण्याचे ठरले. यानंतर दर गुढीपाडव्याला सत्यनारायणाची पूजा घालून दारूबंदीचा वर्धापनदिन साजरा करण्यात येऊ लागला.
२००६ पासून या सात दिवसांचा पारायण सोहळाही सुरू केला. यामुळे गावात दारूबंदीची यात्राच सुरू झाली. गुढीपाडव्याला मुंबईतील चाकरमानी गावात येतात. त्यामुळे मोठा उत्साह याठिकाणी भरू लागला. गेल्या ४५ वर्षांच्या दारूबंदीने गावाने आदर्श निर्माण केला आहे. यंदा दारूबंदीचा वर्धापनदिन व आध्यात्मिक कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी भेट देऊन गावच्या कार्याचे कौतुक केले.
पूर्वजांची प्रथा तरुणांकडून कायमधनगरवाड्यातील पूर्वजांची प्रथा आजच्या तरुणांनी कायमस्वरूपी पुढे चालू ठेवली आहे. पूर्वीच्या जुन्या जाणकार लोकांनी हा अभिनव उपक्रम राबवून एक आध्यात्मिक निर्धाराची लावलेली पणती या पुढील काळात ही तरुण मंडळी निष्ठेने व तेवढ्याच ताकदीने ती तेवत ठेवतील, असे मत रणधीर नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊ लागले होते. गावकऱ्यांनी १९८० च्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शपथ घेऊन दारूबंदी केली. या निमित्ताने दरवर्षी हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन असे आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केला जातो. मुंबईला गेलेले लोक यानिमित्ताने गावी येतात. ही गावची यात्राच गावाने सुरू केली आहे. - बाबूराव डोईफोडे, ग्रामस्थ