मांगले : कोल्हापूर आणि सांगली जिल्हे जोडणाऱ्या वारणा नदीवरील मांगले-काखेदरम्यान नवीन पुलास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच प्रस्तावित १२ कोटी रुपयांच्या पुलाच्या बांधकामाला शासनस्तरावर केंद्रीय राखीव निधीतून (सीआरएफ) मान्यता मिळून, या पुलाचे काम अल्पावधितच मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार शिवाजीराव नाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर आणि सांगली जिल्हे जोडणारा वारणा नदीवरील मांगले-काखेदरम्यानचा पूल पावसाळ्यात सतत पाण्याखाली जातो. यावर्षी दुसऱ्यांदा हा पूल गेल्या नऊ दिवसांपासून पाण्याखाली आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे. गेली तीस वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे.शिराळा ते वाघबिळ (कोल्हापूर) या प्रमुख जिल्हा मार्गावरील सांगली आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे जोडणारा वारणा नदीवरील मांगले-काखे हा नदीपात्रातील पूल पावसाळा सुरू झाला की पाण्याखालीच असतो. त्यामुळे कोल्हापूर, शिरोली, कागल, एमआयडीसी, वारणा उद्योह समूहामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे हाल होतात. शिवाय वारणानगर, कोल्हापूर व वडगाव या ठिकाणी बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत शिÞक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याशिवाय कोल्हापूर, जोतिबा व ऐतिहासिक पन्हाळगडाला जाणारा हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी अथवा पर्यायी पूल उभारावा, अशी मागणी गेल्या २५ वर्षांपासून होत आहे. वारणा नदीवर कोल्हापूर जिल्ह्यास जोडणारा स्वातंत्र्यपूर्व काळातील दगडी पूल नदीतच होता. त्यामुळे पावसाळ्यात पूल पाण्याखालीच असायचा. वारणानगरला तात्यासाहेब कोरे यांनी सहकारी साखर कारखाना सुरू केल्यानंतर रहदारीची अडचण होऊ लागल्याने त्यांनी या पुलावर तात्पुरता लोखंडी पूल उभारला. नंतर माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर १९८६ मध्ये सध्याचा पूल उभारण्यात आला, मात्र त्याचवेळी चांदोली धरणाचे काम सुरू असल्याने नदीला जास्त पाणी येणार नाही, असा अंदाज बांधून पुलाची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्याचा इतिहास आहे. मात्र पुलाचे काम पूर्ण झालेल्यावर्षीच पावसामुळे उद्घाटनापूर्वी अनेक दिवस पूल पाण्याखाली होता. पावसाळ्यानंतर पुलाच्या उद्घाटनावेळी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री शालिनीताई पाटील यांच्या कार्यक्रमावर दगडफेक झाल्याची घटना घडली. तेव्हापासून गेली तीस वर्षे हा पूल पावसाळ्यात अनेक दिवस पाण्याखाली असतो. २००५ च्या पावसाळ्यात तर तब्बल ५२ दिवस पूल पाण्याखाली होता. तेव्हापासूनची मांगलेसह परिसरातील गावांची नवीन पूल बांधण्याची मागणी आहे.कोल्हापूर जिल्ह्याशी जोडणारा वारणा नदीवरील मांगले-काखे पूल पावसाळ्यात सतत पाण्याखाली जातो. त्यामुळे उन्हाळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्र देऊन पुलासाठी आग्रह केला आहे. या पुलाचे अंदाजे १२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. राज्य सरकारकडे इतका निधी उपलब्ध होत नसल्याने केंद्रीय राखीव निधीतून (सीआरएफ) या पुलाला मंजुरी देऊन काम लवकरच मार्गी लावण्याचे नितीन गडकरी यांनी मान्य केले आहे. याबाबतची कार्यवाही करण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वीच गडकरी यांची भेट घेतल्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी सांगितले. याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चाही झाल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रल्हाद पाटील, राजन पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)बालिश कांगावा : शिवाजीराव नाईक महाडच्या घटनेनंतर धोकादायक वाहतूक होणाऱ्या मांगले पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून नवीन पूल बांधण्याची मागणी सत्यजित देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यावर आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, गेली अनेक वर्षे सत्तेवर असताना आतापर्यंत गप्प बसणाऱ्यांनी पहिल्यांदाच पूल बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा केलेला कांगावा बालिश आहे.
मांगले-काखे नवीन पुलास केंद्राची मान्यता
By admin | Published: August 09, 2016 10:59 PM