लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : पडवळवाडी, ता. वाळवा येथील बाबासाहेब आनंदा रूपनर यांच्या शेतातील देवगड हापूसच्या एका आंब्याचे वजन ८५२ ग्रॅम भरले आहे. झाडाला लगडलेला प्रत्येक आंबा हा ८०० ग्रॅमपासून ते ८५२ ग्रॅमपर्यंत वजनाचा आहे.
हुतात्मा संकुलाचे संस्थापक क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या १५ जुलैच्या जयंती दिनी हुतात्मा साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांना आंबा फळांची रोपे लागवडीसाठी मोफत वाटप केली होती. त्यातील हे देवगड हापूस आंब्याचे रोप दहा वर्षांपूर्वी रूपनर यांनी आपल्या शेतात लावले आहे. आज या झाडाला ३०० ते ३५० आंबे लगडले आहेत. या सर्व आंब्यांच्या वजनाची खात्री केली असता ८०० ग्रॅम ते ८५२ ग्रॅमपर्यंतचे वजन आहे. पाचव्या वर्षापासून आंबा खायला उपलब्ध झाला आहे.
रूपनर यांच्या शेतात देवगड हापूस, देवगड पायरी, कलमी व शेपू आंबा अशा प्रकारची आंबा झाडे लावली आहेत. या झाडांची रोपे त्यांना हुतात्मा साखर कारखान्याकडून मिळालेली आहेत.