ढगेवाडी (ता.वाळवा) येथील सरपंचपदी मनीषा नागनाथ खोत यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संदीप सावंत यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी कृष्णात ढगे, शंकर कचरे, नागनाथ खोत उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
ऐतवडे बुद्रूक : तत्कालीन सरपंच व विद्यमान उपसरपंच यांच्या संवादाची क्लिप वायरल झाल्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या ढगेवाडी (ता. वाळवा) येथील सरपंचपदी युवा नेते संदीप सावंत गटाच्या मनीषा नागनाथ खोत यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
येथील लोकनियुक्त सरपंच गौरी विशांत कचरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ७ असून त्यामध्ये चार महिला आहेत.
भाजपच्या सुशीला जाधव यांचे नाव सरपंच पदासाठी प्रामुख्याने घेतले जात होते. मात्र तत्कालीन सरपंच गौरी कचरे व विद्यमान उपसरपंच संजय ढगे यांच्यातील संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यामुळे अचानकपणे गावातील सर्व वातावरण बदलले. गावातील एका प्रमुख भावकीतील लोक दुखावले गेले. त्यामुळे सुशीला जाधव यांचे नाव मागे पडले व संदीप सावंत गटाच्या मनीषा खोत यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी राजेंद्र पाटील यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी ए. व्ही. काकरवाल व ग्रामसेविका एल. एस. जाधव यांनी काम पाहिले. यावेळी संदीप सावंत, मोहन सावंत, शंकर कचरे, कृष्णात ढगे, विजय खोत, प्रकाश खोत, नागनाथ खोत, कृष्णात खोत उपस्थित होते.