भिलवडी-अंकलखोप : साहित्य ही सातत्याने विकसित होणारी गोष्ट आहे, साहित्य माणसांचे अंतरंग श्रीमंत करते. ती केवळ कल्पनेची मिरासदारी नसते तर ती कल्पना आणि वास्तव यांचे मिश्रण असते. जगण्याचे मार्गदर्शन साहित्य करते, असे प्रतिपादन प्रा. वैजनाथ महाजन यांनी गुरुवारी केले.
औदुंबर (ता. पलूस) येथील सदानंद साहित्य मंडळाच्यावतीने आयोजित ७८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलन पार पडले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सदानंद सामंत, कवी सुधांशु, म. भा. भोसले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
खासदार पाटील म्हणाले की, कवी सुधांशु, म. भा. भोसले यांच्या प्रयत्नातून औदुंबर येथे सुरू असलेल्या साहित्य संमेलनाने साहित्य विश्वात नंदादीपासारखी परंपरा निर्माण केली.
शहाजी सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षांचा परिचय सुभाष कवडे यांनी करून दिला. श्रद्धांजली निवेदन ह. रा. जोशी, सूत्रसंचालन वासुदेव जोशी यांनी केले. पुरुषोत्तम जोशी यांनी आभार मानले. कविसंमेलनात कवी नामदेव जाधव, अपर्णा जोशी, चंद्रकांत कन्हेरे, संजय कोष्टी, चंद्रकांत बोधले, प्रकाश जाधव, पवन जोशी, प्रकाश कुलकर्णी, चंद्रकांत देसाई, नूतन सूर्यवंशी, आनंदा कोरे, दत्ता गायकवाड, प्रा. संजय ठिगळे, ह. रा. जोशी यांनी कविता सादर केल्या. प्रा. संतोष काळे यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी अंकलखोपचे सरपंच अनिल विभूते, उपसरपंच विनय पाटील, चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे, शीला महाजन, प्रकाशक अमेय गुप्ते, नरेंद्र पाटील, शामराव पाटील, त्रिलोकनाथ जोशी, विठ्ठल मोहिते, शांतीनाथ मांगले, अभिजित पाटील, रमजान मुल्ला, दयासागर बन्ने उपस्थित होते.
चौकट
खासदारांची कोपरखळी
‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते... मात्र ती पत्नीच असते असे नाही...’ अशी कोपरखळी खा. श्रीनिवास पाटील यांनी मारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांनी रामदास आठवले यांच्या काही चारोळ्या, तसेच मराठीतील कविता, गाण्यांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
फोटो येणार आहे.