सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या वतीने आ. मानसिंगराव नाईक यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे समजते. मात्र, काँग्रेसकडून उपाध्यक्षपदासाठी अद्याप नाव निश्चित करण्यात आले नाही. सोमवारी, ६ डिसेंबर रोजी निवडीवेळी काँग्रेसकडून नाव जाहीर केले जाणार आहे.
बँकेची पंचवार्षिक निवडणूक पार पडल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यपदावर कोण येणार, याची उत्सुकता जिल्ह्यात सर्वत्र होती. जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी निवडणुकीचा अहवाल सहकार निवडणूक प्राधिकरण व विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांच्याकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून पदाधिकारी निवडीची अधिसूचना जारी झाली. जिल्हा बँक संचालक मंडळाची बैठक घेऊन पदाधिकारी निवड करण्याबाबतचा आदेश निवडणूूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी काढला आहे. त्यानुसार सोमवार, दि. ६ डिसेंबर रोजी जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होईल.
अधिसूचना निघाल्याने इच्छुकांच्या राजकीय हालचाली गतिमान होत्या. निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करताना काँग्रेसने अध्यक्षपदावर दावा केला होता. मात्र, सर्वाधिक संचालक राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. अध्यक्षपदासाठी आ. मानसिंगराव नाईक यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते.
काँग्रेसकडून उपाध्यक्षपदासाठी जयश्री पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील हे प्रमुख दावेदार आहेत. शिवसेनाही उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे. त्यातील आ. अनिल बाबर आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसला उपाध्यक्षपद देण्याचे निश्चित झाल्याचे समजते. मात्र, काँग्रेसकडून या पदासाठी अद्याप नावावर एकमत झालेले नाही. गेल्या चार दिवसांपासून काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, नाव निश्चित झालेले नाही. त्यामुळे काँग्रेसमधून कोणाला संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
काँग्रेस व शिवसेनेला समान संधी
उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस व शिवसेनेला समान संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येकी अडीच वर्षांसाठी त्यांना संधी मिळू शकते.
काँग्रेसमध्ये उपाध्यक्षपदासाठी नावाची चर्चा सुरू आहे. अद्याप निश्चित काही झालेले नाही. निवडीवेळी पक्षामार्फत नाव जाहीर केले जाईल. - आ. विक्रम सावंत, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस